शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून ते शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांशी संवाद साधत आहेत. रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात शिवसंकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी तडाखेबाज भाषण केले. त्यांनी मिंधे आणि भाजपवर प्रहार करत सध्याच्या आंधाराला दूर करण्यासाठी मशालीची गरज असल्याचे सांगितले.
आपल्याला यायला उशीर झालाय. निवडणुकीसारखा उशीरा आलो आहे. आपल्या निवडणुकाही उशीरा येत आहेत. विमानतळ बंद असल्याने येण्यासाठी उशीर झाला. लोकसभा निवडणुकी आधीचे आणि आताचे चित्र यात खूप फरक आहे. देशभरात आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. लोकसभेचा 4 जूनचा निकाल आपल्या देशासाठी संविधानासाठी, जनतेसाठी खूप महत्त्वाचा होता. भाजपला आपल्या देशाचे संविधान बदलायचे होते. त्यांचे काही खासदारच संविधान बदलण्यासाठी 400 पार जागांवर पाठवा असे सांगत होते.
आपला आणि देशातील जनतेचा आवाज दाबत त्यांच्या हक्क्यांवर गदा आणण्यासाठीच त्यांना संविधान बदलायचे होते. आपला आवाज, लोकशाही दाबण्यासाठीच त्यांना संविधान बदलायचे होते. आता 400 पारच्या घोषणा देणारे 200 जागांच्या आसपास पोहचले आहेत. देशात कोणीही समाधानी नसल्याचे दिसत होते. राज्यात शेतकरी, महिला, सर्वसामान्य, बेरोजगार तरुण कोणीही समाधानी दिसत नव्हते. त्यामुळे आपल्या देशाचे संविधान धोक्यात आहे, याची जाणीव जनतेला झाली होती. त्यातूनच जनतेने देशात बदल घडवला आहे.
50 खोकेवाल्यांना सध्या काही मिळाले असले, तरी महाराष्ट्राला आणि राज्यातील जनतेला गेल्या दोन वर्षात जे हवे होते, ते मिळाले आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जी प्रगती गद्दार आणि खोकेवाल्यांची झाली आहे, तशी महाराष्ट्राची झाली आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आपली लढाई अजूनही सुरू आहे. संविधान रक्षणाची गरज महाराष्ट्राला आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. न्यायालयाचा निकाल जेव्हा येईल, तेव्हा कळेल की हे सरकार बेकायदा होते. राज्यात सध्या लोकशाही दिसत नाही. कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही. नगरसेवक, महापौर आणि समित्या नाही. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत.
भीती वाटत असल्याने ते निवडणुकीला सामोरे जात नाही. त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे, असे दिसते. मिंधे सरकार फक्त कंत्राटदारांचे मंत्री आहे. ही संविधान रक्षणासोबतच मराठी अस्मितेची लढाई आहे. आपला सुवर्णकाळ कुठे गेला, अशी प्रश्न पडावा, अशी यांनी राज्याची अवस्था केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात छत्रपती संभाजीनगरचे रस्ते चांगल्या स्थितीत होते. आपण केलेली कामे जनतेसमोर होती. आपण विकास करत होते. पर्यटन वाढवण्यासोबतच आपण शाश्वत विकास केला आहे. मात्र, दोन वर्षात राज्यात जे उद्योग होते, तेही राज्याबाहेर गेले आहेत. भाजपचे धोरण महाराष्ट्रविरोधी आहे, हे दिसून येत आहे.
सध्या राज्याच्या उद्योगमंत्र्याचे उद्योग जनतेमोर आहे. रस्ते आहेत, डांबर दिसतच नाही, फक्त खड्डे आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत आहे. आपण राज्यात अनेक उद्योग आणणार होतो. ते सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवण्यात आले. वेदांता फॉक्सकॉन राज्यात येणार, हे निश्चत होते. मात्र, आता ते गुजरातमध्ये पळवून नेले आहे. प्रदूषण नियामक मंडळाने धाड टाकली, की काही मिळवण्यासाठी कारवाई होती. मर्सिडीज बेंझ कंपनीचे काय चुकले, ते त्यांनी जाहीर करावे, याबाबतचे ट्विट डिलीट का करण्यात आले, असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पाठवून राज्यातील तरुणांना जर्मनीत पाठवण्याचे प्रलोभन दाखवण्यात येत आहे. त्या देशात नोकरी मिळवून तिथे पाठवणे शक्य नसल्याचे दिसत आहे. याचा तरुणांनी विचार करण्याची गरज आहे. आपण जर्मनीतही जाऊ शकत नाही आणि गुजरातमध्ये आपल्याला नोकऱ्या देत नाही. आम्हाला आमच्या हक्काचे मिळायला हवे. गुजरातलाही त्यांच्या हक्काचे द्या, पण आमच्या हक्काचे गुजरातला द्याल, तर मी नडणार म्हणजे नडणारच, अशी गर्जनाही आदित्य ठाकरे यांनी केली.
लाडका उद्योगपती, लाडका माझा कॉटॅक्टर अशी त्यांची योजना सुरू आहे. उत्तर प्रदेशात यांचा पराभव झाला कारण तिथे स्थानिकांना डावलण्यात आले. त्याचा परिणाम दिसून आला. देशात परीक्षा पद्धतीत घोळ सुरू आहे. एमपीएससी आणि एक परीक्षा एकच दिवशी आल्या होत्या. स्पर्धा-परीक्षा तरुणांच्या रोजगाराशी निगडीत आहेत. तरुणांच्या भवितव्याशी खेळू नका, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
राज्यातील जनतेने काय करायचे, नोकरीसाठी, रोजच्या समस्यांसाठी कोणाकडे जायचे, असा प्रश्न आहे. आज 100 इचछुक असतील पण आपला जो कोणी उमेदवार आहे, त्यांच्याच विजय झाला पाहिजे, यासाठी कामाला लागा. सध्याच्या काळातील अंधार दूर करण्यासाठी मशालीची गरज आहे. 10 वर्षापुर्वी जे 15 लाखांबाबत बोलत होते, ते आता दीड हजारावर आले आहे. आपले सरकार आल्यावर बहिणींना वाढीव रक्कम देऊ, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
सत्तेतील एका मंत्र्यांने सुप्रिया सुळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती, असे मंत्री तुमचे भाऊ असू शकतात का, एक मंत्री म्हणाले अशा घटना होत असतात. अशा लोकांना ते मंत्रईपदावर ठेवत आहे. असे लोक महिलांचे भाऊ असू शकतात का, अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्ज्वला प्रचारासाठी जाणारे पंतप्रधान आणि भाजप महिलांचा भाऊ होऊ शकतो का, असा सवालही त्यांनी केला.
आपले शनिवारचे आंदोलन हे विकृतीविरोधात संस्कृती असे होते. आपण विकृतीविरोधात आवाज उठवला आणि भाजपने आपल्याविरोधात आंदोलन केले. आपले आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नव्हते. महिलांना वाढीव रक्कम देण्याचे आश्वासन ते देत आहेत. मात्र, हिंमत असेल तर आताच वाढीव रक्कम द्या, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले. आमचे सरकार येणारच आहे आणि वाढीव रक्कमही देणार आहोत. शक्ती कायदादेखील त्यांनी रखडवला आहे. महिला सक्षमीकरणासाठी असलेला कायदाही त्यांनी रोखला आहे.
राज्यातील जनतेला दोन वर्षांपासून आपले सरकार आहे, असे वाटते का,शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. आता महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आता राज्यातील जनता भाजपच्या भूलथापांना फसणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करण्याची गरज आहे. आता जे सुरू आहे, ते किती जणांना मान्य आहे. हे सर्व बदलायचे असेल तर आपल्याला एकत्र यावेच लागेल. लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहीण हवी असेल, तर आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी आपल्याला बदल घडवावाच लागेल. मुख्यमंत्र्यांची शेती जबरदस्त आहे. त्यांना फक्त अमावस्या आण पोर्णमेलाच शेतात जावे लागते. ते हेलिकॉप्टरने शेतात जातात आणि राज्यातील शेकतरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला एकत्र येत वज्रमूठ उगारायची आहे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. राज्याविरोधात असलेल्या शक्तींना एकतेच्या वज्रमुठीचा ठोसा द्यावाच लागेल.