
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आज नाशिकमधून सुरू झाला. नाशिकमध्ये संध्याकाळी त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एकदा आव्हान दिले आहे. ‘तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, आमदारकीचा राजीनामा द्या. मी ठाण्यातून लढायला तयार आहे.’ असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
”मी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलेलं की त्यांनी आता राजीनामा देऊन माझ्या समोर वरळीतून निवडणूक लढवून व जिंकून दाखवायची. माझ्य़ाकडे ना केंद्र सरकार, ना कोणती यंत्रणा आहे ना पोलीस यंत्रणा आहे. माझ्याकडे काहीच नाही. मी साधा आमदार आहे. पण त्यांची काही हिंमत झाली नाही. त्यांनी देशभरातील जी भाजपची आयटीसेल आहे. त्यांना सांगितलं की आदित्य ठाकरे यांना शिव्या द्या. पण जेवढ्या शिव्या दिल्या तेवढं मला बरं वाटतंय. आपण काहीतरी योग्य करतोय हे समजतंय. मी कधी शिवी दिली नाही कारण माझ्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. पण एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही मला फोन करून सांगितलं असतं मला वरळीतून लढायला जमणार नाही तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज दिलं असतं. मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा व आमदाराकीचा राजीनामा द्या. मी तुमच्या विरोधात ठाण्यातून निवडणूक लढवतो. होऊन जाऊ दे एकदाचं. मला माहित आहे ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो शिवसेनेसोबतच उभा राहणार” असे आदित्य ठाकरे म्हणाले.