आदित्य ठाकरेंची वरळीत बाईक रॅली! मुंबईत शेवटच्या दिवशी प्रचाराची धूम

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी वरळी आणि धारावी येथे बाईक रॅलीच्या माध्यमातून रोडशो करत मतदारांशी थेट संपर्क साधला. युवक मतदारांनी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिकशी मुंबईत पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी कोसळत असतानाही मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी चौकसभा, रोड शो, बाईक रॅली, पदयात्रांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघ पिंजून काढले. वरळी विधानसभेतील महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भरपावसात वरळी आणि धारावीमध्ये बाईक रॅली काढत थेट मतदारांशी संवाद साधला.

उमेदकार प्रमुख रस्त्यांवरून फिरत असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गल्लीबोळांमधील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबई प्रचारमय झाली होती. विधानसभा निवडणुकीची प्रचाराची सांगता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी दुचाकी रॅलीने केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी आणि धारावी विधानसभा मतदारसंघात रोड-शो केला. अभिनेता सलमान खान यांचा अंगरक्षक शेरा देखील प्रचार रॅलीत सहभागी झाला होता. शिवबंधन बांधत त्याने शिवसेनेत प्रवेश केला आणि रॅलीत हजेरी लावली. आदित्य ठाकरे यांचे ठिकठिकाणी युवक मतदारांनी जोरदार स्वागत करत नवा महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला.

उरणमध्ये प्रचंड पावसात उद्धव ठाकरेंची तुफानी सभा

कलिना येथे संजय पोतनीस यांच्या प्रचार रॅलीत खासदार पूनम महाजन सहभागी झाल्या होत्या. तर शिवडी येथे अजय चौधरी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत अभिनेत्री परी तेलंग, अभिनेता सुशांत शेलार सहभागी झाले होते. मागाठणे येथे शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी प्रचार यात्रा काढली. वांद्रे पश्चिम येथील भाजप उमेदवार ऍड. आशीष शेलार, कांदिवली येथील उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस उमेदवार नसीम खान यांच्या प्रचारार्थ चांदिवली येथे रोडशोचे आयोजन करण्यात आले होते.

फेसबुक लाईव्हद्वारे उमेदवार  मतदारांच्या संपर्कात

बाईक रॅली, प्रचार यात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधत असताना काही उमेदवारांनी फेसबुक लाईव्हद्वारे मतदारांशी संपर्क साधला. मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपायोजना, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न विविध मुद्दय़ांवर उमेदवारांनी यादरम्यान चर्चा केली.

आपली प्रतिक्रिया द्या