झोमॅटोच्या तानाशाही विरोधात शिवसेनेचे डिलीव्हरी बॉईजसोबत नागपुरात आंदोलन

सामना प्रतिनिधी । नागपूर

ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोच्या तानाशाही पध्दतीला त्रासून संविधान चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात व शहर समन्वयक नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात कंपनीच्या डिलीव्हरी बॉईजने जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सुमारे 800 डिलीव्हरी बॉईजने एकत्रित येऊन डोक्यावर व हातावर काळी पट्टी बांधून कंपनीविरोधात आक्रमकपणे प्रदर्शन करून नारेबाजी केली.

कंपनीकडून वाढविलेल्या डिलीव्हरी टार्गेट व इंसेटीव्हमध्ये कपात केल्यामुळे शहरातील रायडर्समध्ये असंतोष आहे. शिवसेना कार्यकर्त्यांसह डिलीव्हरी बॉईजने कंपनीला 24 तासांचा अल्टीमेटम देत रायडर्सची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. त्वरित रायडर्सची समस्या सोडविण्यात आली नाही तर शहरामध्ये एकही ऑर्डर केल्या जाणार नसल्याचा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला.

कंपनीकडून कोणतीही सुविधा दिल्या जात नसतांनाही डिलीव्हरी बॉईज ग्राहकांना वेळेवर ऑर्डर पोहोचवित आहे. त्यानंतरही कंपनीने आधीच्या तुलनेत दररोजचा इंसेटीव्ह 50 रुपयावरून 30 रुपये केला व ऑर्डरचे टार्गेट 16 वरून वाढवून 20 ते 22 करण्यात आले आहे. इंसेटीव्ह कमी करणे व ऑर्डरचे टार्गेट वाढविल्याने डिलीव्हरी बॉईजमध्ये कंपनी विरोधात रोष पसरला आहे. सोमवार ते गुरूवारपर्यंत कंपनीकडून आधी प्रती दिवस 16 ऑर्डर डिलीव्हरीचे टार्गेट दिले जात होते, त्यामध्ये प्रतीदिवस रायडर्सला 525 रुपये इंसेंटीव्ह मिळत होता. ज्याला नुकतेच कमी करण्यात आले. याशिवाय कंपनीने डिलीव्हरी क्षेत्राला वाढवून 10 किमी ते 15 किमी केले आहे. टार्गेट व डिलीव्हरी क्षेत्र वाढवून कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे.

डिलीव्हरी बंद करण्याचा इशारा
डिलीव्हरी बॉईजचे म्हणणे आहे की, जर 24 तासांच्या आत समस्येचे निराकरण करून पुन्हा जुने टार्गेट अंमलात आणून इंसेंटीव्ह पूर्ववत केला नाही तर शिवसेना झोमॅटो विरोधात तीव्र आंदोलन करेल. सोबतच संपूर्ण शहरात त्यांची डिलीव्हरी बंद करण्यात येईल.