‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिवसैनिकांनी घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी

28

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते रामदासभाई कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन विचापूस करणाऱ्या ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानात शनिवारी नाळवंडी सर्कलमधील वांगी, शिवनी, ढेकणमोहा, मौजवाडी या गावांना भेटी दिल्या. फसव्या कर्जमाफीनंतर सहा महिन्यात १५०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ‘या’ आत्महत्यास भाजप जबाबदार असल्याचा घणाघात यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला.

शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत सकाळच्या सत्रात वांगी, शिवनी, व दुपारच्या सत्रात ढेकणमोहा, मौजवाडी या गावांना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भेटी दिल्या. यावेळी जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली यानंतरच्या ६ महिन्याच्या कालावधीत म्हणजे जानेवारी २०१८ पर्यंत १५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून या भाजपच्या (तत्वतः) फसव्या कर्जमाफीमुळेच झाल्या असल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुखांनी केला. ज्या कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा होता त्याच कर्जमाफीच्या परिणामशून्यतेने शेतकरी नैराश्यग्रस्त झालेला असून यास भाजप जबाबदार असल्याचे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख खांडेंसह तालुकाप्रमुख उल्हास गिराम, ठिकठिकाणचे शेतकरी, आजीमाजी पक्षपदाधिकारी, शिवसैनिक, युवक, महीला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने अभियानावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या