म्हादई बाबत पर्रिकरांना गोव्यापेक्षा जास्त चिंता कर्नाटकची!: शिवसेना

सामना ऑनलाईन । पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हादईच्या पाणी वाटपाबाबत गोव्याचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असा देखावा करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यांना खरी चिंता आहे ती कर्नाटक मधील भाजपची हे आता लपून राहिलेले नाही.कर्नाटक मधील भाजपला सत्तेवर आणण्यासाठी पर्रिकर यांनी कर्नाटक भाजपचे अध्यक्ष येडियुराप्पा यांना पत्र लिहून आपण कर्नाटकच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याची पर्रिकर यांची परंपरा असल्याने पर्रिकर यांनी म्हादई बाबत आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची दिशाभूल थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी नाईक यांनी केली आहे.

पर्रिकर यांनी येडीयुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रानंतर स्वयंसेवी संघटनांनी म्हादई वाचवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे शिवसेना समर्थन करत असून शिवसेना म्हादईचा एक थेंब देखील कर्नाटककडे वळवू देणार नाही, असे नाईक यांनी म्हटले आहे. नाईक म्हणाल्या, पर्रिकर यांनी लोकांच्या विरोधानंतर नेहमी प्रमाणे युटर्न घेत आपण गोव्याचे हित साधणार असल्याचे ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी पर्रिकर यांचा हेतू नेमका काय आहे हे सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डने जाहीरपणे सांगितले आहे.

म्हादईच्या पाणी वाटपा बाबत पर्रिकर हे कर्नाटकशी केव्हा चर्चा करणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करायला हवे अशी मागणी करून नाईक म्हणाल्या,अन्यथा या विषयावर पहिल्यांदाच चर्चा झाली असून कर्नाटकला पाणी देण्याचा निर्णय झाला आहे,याची माहिती जनतेला द्यावी. राज्य सरकारचे कायदा सल्लागार आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकची ०.१ टीएमसी पिण्याच्या पाण्याची मागणी असल्याचे सांगितले आहे.त्यांचे हे वक्तव्य लक्षात घेता कर्नाटकला पाणी देण्याचा निर्णय झाला असावा अशी शंका घ्यायला वाव असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या