जनसागर नतमस्तक! शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर अलोट गर्दी

898

ज्वलंत हिंदुत्वाचे सरसेनापती, लाखो-करोडो शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनगटात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी आज राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयातून स्मृतिस्थळावर शिवसैनिक-शिवसेनाप्रेमींचा जनसागर उसळला. भगवे झेंडे, भगवी उपरणी, भगवा पोषाख आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी शिवतीर्थ दुमदुमून गेले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 94 वा जन्मदिवस. स्मृतिस्थळावर येणाऱया प्रत्येकाच्या चेहऱयावर स्वाभिमानाचे तेज होते. बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी बुधवारपासूनच शेकडो शिवसैनिकांचे जथेच्या जथे शिवतीर्थावर येऊ लागले होते. स्मृतिस्थळावर येणाऱयांमध्ये केवळ मराठीच नव्हे तर मुस्लिमांसह बहुभाषिकही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेना भवनजवळ तोबा गर्दी

शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर जाताना शिवसेना भवन येथेही शिवसैनिक थांबून वास्तूवरील बाळासाहेबांच्या पुतळ्याला मनोभावे वंदन करीत होते. शिवसेना भवनासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांची घाई उडत होती. शिवसेना भवनासोबतची सेल्फी आपल्याला अभिमानास्पद असल्याची भावना ते यावेळी व्यक्त करीत होते.

पाच वर्षे परभणीहून येणारा शिवसैनिक

स्मृतिस्थळावर येणाऱया शिवसैनिकांमध्ये ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे प्रमाणही मोठे होते. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी रामचंद्र गायकवाड हे परभणीहून सायकलवरून आले होते. 17 जानेवारीला ते परभणीहून निघून आज सकाळी स्मृतिस्थळावर पोहोचले. त्यांनी आपल्या सायकलला भगवा रंग दिला होता. शिवाय सायकलवर शिवसेनाप्रमुखांची तेजस्वी प्रतिमाही लावली होती.

मान्यवरांकडून अभिवादन

शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी सकाळपासूनच अनेक मंत्री, आमदार, खासदार येत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अजय चौधरी, वैभव नाईक, मनीषा कायंदे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, दीपक केसरकर, गिरीश पाटील, कपिल पाटील, रवींद्र वायकर, राजन साळवी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, अनंत तरे, विनोद तावडे, बबन पाटील, स्नेहल आंबेकर, दत्ता दळवी, दगडू सकपाळ, शिशिर शिंदे, माजी आमदार तारासिंग, नितीन बानुगडे-पाटील, नितीन नांदगावकर, सदानंद मंडलिक, अश्विन शहा यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

लहान-थोर, नेते-पुढारी, सर्वसामान्य झाले नतमस्तक

शिवसेनाप्रमुख हे केवळ शिवसैनिकांचेच नव्हे तर लहान-थोर आणि लाखो-करोडो शिवसेनाप्रेमींचे लाडके नेते होते. त्यामुळे बाळासाहेबांना वंदन करणाऱयासाठी येणाऱयांमध्ये अगदी चार वर्षांच्या मुलांपासून 70 ते 80 वर्षांच्या वयोवृद्धांचाही समावेश होता. यामध्ये कांदिवलीहून बाळासाहेबांचा फोटो गळ्यात घालून आलेली पलक सावंतसारखी चिमुकलीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

शिवतीर्थ झाले भगवेमय

जन्मदिनानिमित्त आलेल्या शिवसैनिकांकडून वाहण्यात येणारी आदरांजली, पुष्पांजली आणि मनोभावे केले जाणारे वंदन यामुळे शिवतीर्थावर भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्मृतिस्थळावर रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांना प्रिय असणाऱया मनमोहक सुगंधी चाफ्याच्या फुलांचे हार, परिसरात केलेली रोषणाई आणि परिसरात लावलेल्या भगव्या झेंडय़ांमुळे शिवतीर्थ भगवेमय झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या