आमच्या कल्याण आणि ठाण्यातील दोन्ही बॅटस्मननी ‘करून दाखवले’!

सामना ऑनलाईन । ठाणे-कल्याण

महाराष्ट्रातील निवडणुकांचा हा अखेरचा टप्पा आहे. पण आजच्या या सभांची वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कल्याण आणि ठाण्यातील दोन्ही बॅटस्मननी करून दाखवले आहे. कल्याण, ठाण्यात रेल्वे फेऱ्या वाढल्या, जलवाहतूक आली, मेट्रो येणार आहे, रस्ते रुंद होत आहेत, आरोग्यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारली जात आहेत. आपण हवेत वार्ता न करता जे बोलतो ते करून दाखवतो, आपले केलेल्या कामाचे पुस्तक आहे. विरोधकांना फक्त ते वाचता आले पाहिजेत अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

कोल्हापुरातून सुरू झालेला महायुतीच्या प्रचाराचा झंझावात कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रानंतर आज कल्याण, ठाण्यात अवतरला. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या विराट विराट गर्दीच्या तडाखेबंद सभा झाल्या. पहिली सभा कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथील वेणुगोपाळ मंदिराचे विस्तीर्ण मैदान तर दुसरी सभा ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील भव्य रस्त्यावर झाली. दोन्ही सभा तुफान गर्दीमुळे रेकॉर्डब्रेक अशाच ठरल्या. भाषणाच्या सुरुवातीलाच तमाम कल्याणवासीयांनी उभे राहून टाळ्यांचा गजर आणि गगनभेदी घोषणा देत उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे चार ते पाच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजप महायुतीत पंतप्रधानांचे एकच नाव ठरले आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आमच्यात एक विचार आणि एक दिशा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे बुडे खूप आहेत पण चेहराच नाही आणि या बिनचेहऱ्याच्या पक्षांकडे विचार तरी कोणते आहेत. श्रीकांत आणि राजन यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असे ठामपणे सांगणारा शिवसेना-भाजप हा एकमेव पक्ष आहे. विरोधकांना मोदी आणि हिंदुत्ववादी संघटना नकोत मग कोण हवे आहेत असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते अल्ताफ शेख, विजय कदम, अनंत तरे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याणच्या महापौर विनिता राणे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, रूपेश म्हात्रे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, गणपत गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ जनशक्तीचे अध्यक्ष प्रा. अर्जुन डांगळे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी महापौर रमेश जाधव, राजेंद्र देवळेकर, महानगरप्रमुख विजय साळवी, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नवीन गवळी यांच्यासह मोठय़ा संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे कोणतेही स्वागत आणि सत्कार स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. तसेच दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

ठाणेकरांचा 500 चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणारच
500 चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणारच हे वचन शिवसेनेने दिले आहे. मुंबईत तशी घोषणाच महापालिकेने केली आहे. ठाणेकरांचासुद्धा 500 चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणारच अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. विरोधक यावर जाब विचारतात, पण तुम्हाला वाचता येत असेल तर आमच्या अहवालाची पुस्तके वाचा. दिलेली वचने आम्ही पूर्ण करतोच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

तुमच्या पक्षप्रमुखांना देशहित काय आणि देशविघातक काय… का कळत नाही?
शरद पवार यांच्या काळात चारा छावणी आणि शेणाचा घोटाळा झाला. पवार म्हणजे जाऊ तिथे खाऊ. पवारांचा शेतकऱ्यांसोबत फोटो आल्याने शेतकरीच चिंताग्रस्त झाले आहेत. आता पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांवर ते शंका उपस्थित करीत आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे ऋण आपण फेडू शकणार नाही त्यांच्या शौर्यावरही शंका आहे. राहुल गांधी तर देशद्रोहाचे कलमच रद्द करायला निघाला आहे. मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारतो की, हा देश जसा आमचा आहे तसा तुमचाही आहे ना? मग तुमच्या पक्षप्रमुखांना देशहित आणि देशविघातक का कळत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यांचे कोटींचे घोटाळे… आमची कोटींची विकासकामे…
काँग्रेस-आघाडी सरकारला 60 वर्षे संधी मिळाली. त्यात त्यांनी भ्रष्टाचाराचा डोंगर रचला. त्यांच्या काळात रोज हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या बातम्या यायच्या आणि आमच्या सरकारच्या काळात कोटींच्या विकास योजना मार्गी लागल्या. त्यांचं देशाला खड्डय़ात घालणारं कोटींचं उड्डाण तर आमचं देशाला विकासाकडे नेणारं कोटी कोटीचं उड्डाण. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात हा देश देणार काय? असा सवाले उद्धव ठाकरे यांनी केला.

महायुतीचे सरकार आणण्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा – शिंदे
देशात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार आणण्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा आहे. भाजप-शिवसेनेत जे मतभेद होते ते मिटले आहेत आणि झालेली युती ही मनापासूनची आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार त्यांना विक्रमी मतांनी विजयी करतील असा विश्वास शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

श्रीकांतच्या सर्जरीने विरोधकांना गुंगी
डॉ. श्रीकांत शिंदे याला पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा तो डॉक्टर आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही अशी टीका विरोधकांनी केली होती. पण श्रीकांत विकासकामे करणारा देशातील चौदावा आणि राज्यातील पाचवा खासदार असल्याचा गौरव इंडिया टुडेने केल्यानंतर विरोधकांची तोंडे गप्प झाली आहेत. या मतदारसंघाची श्रीकांतने जी सर्जरी केली ते पाहून विरोधकांना गुंगी आली आहे असे टोलेही उद्धव ठाकरे यांनी लगावले. कल्याण आणि ठाणे हे हिंदुत्त्वाचे आणि भगव्याचे बालेकिल्ले आहेत. संकटसमयी ही दोन्ही शहरे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा कदापीही जाऊ देणार नाही असे वचन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

तीन हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, मनसेचे माजी नगरसेवक शरद गंभीरराव, दुर्गेश चव्हाण, उत्तर भारतीय समाजाचे देवेंद्र सिंग, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे, पत्रकार योगेश शुक्ला, दिनेश मिश्रा, संजय म्हसे, मातंग समाज संघटना आदी तीन हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या हाती भगवा दिला. ठाण्यातही राष्ट्रवादीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर अखिल भारतीय जनसंघाचे उमेदवार दिलीप अलोणी यांनी आपली उमेदवारी मागे घेत राजन विचारे यांना पाठिंबा दिला.