शिवसेना नगरसेवकाचा मनपाच्या सभेत आत्मदहनाचा प्रयत्न

941

राज्य शासनाने महानगरपालिकेच्या वाढीव क्षेत्राच्या प्रारूप योजनेचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शहराशेजारील गावाच्या 235 भूखंडांवर आरक्षण टाकले आहे. या प्रस्तावित आराखड्याला विरोध म्हणून गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी सभागृहातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

राज्य शासनाने प्रस्तावित केलेला आराखडा रद्द करण्यात यावा यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर दीक्षा धबाले यांची उपस्थिती होती. काँग्रेसने विकास आराखड्याला विरोध करत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या विशेष सभेचे श्रेय शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी कोणालाही जाऊ दिले नाही. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न करून विरोध केल्याने काँग्रेसचा डाव हाणून पाडल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. या विकास आराखड्याला सर्वच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला व हा आराखडा रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची मागणी लावून धरली. यावर महापौरांनी हा विकास आरखड्याविरुद्धचा ठराव शासनाला पाठविण्यात येईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या