शेतकऱ्यांना एकरी 25 हजार नुकसान भरपाई द्या! शिवसेनेची मागणी

1546

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक आयोजित केले होती. या बैठकीत शिवसेनेने ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, रामदार कदम यांच्यासह शिवसेनेचे सहा मंत्री सहभागी झाले होते. ओल्या दुष्काळासंदर्भात या बैठकीचे आयोजन करत होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदार कदम यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. या दरम्यान शिवसेनेने शेतकऱ्यांनी एकरी 25 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पीकविमा नाही, कर्जमाफी नाही… आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. पण तुमच्या आत्महत्येने प्रश्न सुटणार आहे का? आणि कशासाठी जीव द्यायचा? संकट कितीही गंभीर असो, काळजी करू नका… शिवसेना तुमच्यासोबत आहे. जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर सर्वात अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार, त्याचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच! असा आश्वासक शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. ओल्या दुष्काळामुळे खरीप हातचा गेला आहे. रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ 25 हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या