अदानीप्रकरणी जेपीसी चौकशी हवीच! शिवसेनेचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर बहिष्कार

अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठीत करण्याची मागणी फेटाळणाऱया व याप्रकरणी चर्चा टाळणाऱया केंद्र सरकारचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरच्या चर्चेवर बहिष्कार घातला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत या चर्चेत शिवसेनेचे सदस्य सहभागी होणार नाहीत. याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर मंगळवारी संसदेत चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेवर बहिष्कार टाकताना शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अदानी समूहावरील आरोप गंभीर आहेत. शेअर्समध्ये हेराफेरी, किंमत निश्चिती आणि शेअर बाजारातील राउंड ट्रिपिंग या सर्वाबाबत सत्य समोर आले पाहिजे. त्यासाठी जेपीसी चौकशी व्हायलाच हवी, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले. केंद्र सरकार जेपीसी गठीत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याचा निषेध म्हणून शिवसेनेने अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे संजय राऊत यांनी पुढे स्पष्ट केले.

अदानी प्रकरणी संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या सर्वाची जेपीसी चौकशी व्हायला हवी या मागणीवर विरोधक एकजूट आहेत, असेही राऊत यांनी ठणकावले.