घनकचरा घोटाळा मनपाने प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची तक्रार

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणे थेट प्रसारमाध्यमाना सादर केल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे, यासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत संदर्भात न्यायालयाने महानगरपालिकेचे प्रभारी घनकचरा विभाग प्रमुख यांना दिनांक 23 रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरगडल्ला यांनी दिले आहे आहेत.

महानगरपालिकेमध्ये घनकचरा विभागामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, या संदर्भामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत नंतर येथील न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

घनकचरा विभागातील घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे प्रभारी घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख यांनी न्यायालयाच्या निकालानंतर लेखी म्हणणे प्रसारमाध्यमांकडे दिले. यामध्ये त्यांनी न्यायालयामध्ये खटला सुरू झाला असताना तत्कालीन आयुक्त व आरोग्य अधिकारी यांना कोणत्या प्रकारची विचारणा करण्यात आलेली नव्हती, असे त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले होते. जाधव यांनी आज त्यांचे वकील अभिजीत पुप्पाल यांच्या मार्फत न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे व प्रभारी अधिकारी किशोर देशमुख यांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी याकरिता याचिका दाखल केली होती.

जाधव यांच्या वतीने त्यांचे वकील अभिजीत पुप्पाल यांनी बाजू मांडताना किशोर देशमुख यांना खुलासा करण्याचे कोणतेही कारण नव्हते. ते या संदर्भातला खुलासा करू शकत नाहीत त्यांना तसे अधिकार पण नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्तांवर असते, देशमुख यांना खुलासा देण्याचे कोणतेही कारण नाही मग यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा खुलासा केला हेसुद्धा पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे, त्यांनी न्यायालयाची आणि जनतेची दिशाभूल करून डोळ्यांमध्ये धूळ फेक करत केलेला खुलासा हा न्यायालयाचा अवमान करणारा आहे ,त्यामुळे या सर्वांवर तात्काळ कारवाई करावी, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने या संदर्भातले म्हणणे ऐकल्यानंतर दिनांक 23 रोजी महानगरपालिकेचे अधिकारी किशोर देशमुख यांना लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या संदर्भामध्ये जाधव यांचे वकील पुप्पाल यांनी आज याचिका दाखल करून म्हणणे सादर केले आहे आता गुन्हा दाखल झालेला असताना अशा प्रकारचा खुलासा करता येत नाही एक प्रकारे हा दबावतंत्राचा वापर कोणी करत आहे का हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.