शिवसेनेने दूधगंगा नदीवर घातले कर्नाटक सरकारचे श्राद्ध

663
shiv-sena-karnataka-dudhganga

मराठीद्वेषाने पछाडलेल्या कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील इदलहोंड आणि कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलन मोडून काढण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न झाला असतानाच, आता निपाणी येथील मराठी साहित्य संमेलनावरही वक्रदृष्टी पडली आहे. येत्या शनिवारी होणाऱया या संमेलनाची जय्यत तयारी झाली असताना, ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांना मज्जाव करून मराठी संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱया कर्नाटक सरकारचे जिल्हा शिवसेनेकडून दूधगंगा नदीवर श्राद्ध घालून निषेध करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱया 20 लाख मराठी भाषकांच्या भावना समजून घेत सद्भावना रुजविण्यासाठी बेळगाव येथे कुद्रिमनी आणि इदलहोंड येथे 17वे ‘गुंफण सद्भावना साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही साहित्य संमेलनांना रात्री उशिरा परवानगी देण्यात आली; पण संमेलनादिवशी संमेलनाचे अध्यक्ष व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासह महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्वच मराठी भाषक साहित्यिकांना येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. यासोबतच मराठी भाषक सीमाभागात प्रतिवर्षीप्रमाणे निपाणी येथे साहित्य रसिक मंडळाकडून येत्या 18 व 19 जानेवारी रोजी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. निपाणीलगतच महाराष्ट्राच्या हद्दीत देवचंद महाविद्यालयात हे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. अच्युत माने यांच्याकडून याची तयारी सुरू आहे. याची जोरदार तयारी झाली असतानाच, जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी तणावपूर्ण परिस्थिती, तसेच वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरून आदेशाचे कारण पुढे करत परवानगी नाकारून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात केला. बेळगाव, बिदर, कारवार, भालकी, निपाणीसह 20 लाख मराठी माणसांचा अपमान केला आहे. याचा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या