माढ्यातील अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी । माढा

माढा शहर आणि ग्रामिण भागात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. प्रशासनाचा कोणताच धाक नसल्याने या परिसरात राजरोसपणे अवैद्य धंदे सुरू आहेत. या विरोधात शिवसेनेने आक्रमक भुमीका घेतली असून माढा शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी माढा पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अवैध व्यावसायिकावर तातडीने कारवाई करा अन्यथा  तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

माढा शहर तसेच दारफळ, तांदुळ वाडी, वडशिंगे निमगाव, उंदरगाव, उपळाई खुर्द या गावात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू आहेत. याबाबत अनेक तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे पोलीस अवैद्य धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जातोय. माढा शहरात लोकवर्गणीतून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून ते सुरु करण्यासाठीही कोणतीच उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे 21 जून पर्यंत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. याबाबतचे निवेदन माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खैरमोडे आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख शंभूराजे साठे, मुन्नाराजे साठे, युवा सेना शहर प्रमुख भैय्या खरात, बबन पाटील, राहुल शिंदे, मगन लेंगरे, प्रमोद विद्यासागर, शरद वारगड यांच्यासह महिला कार्यकर्त्याही उपस्थिती होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या