मुंबईच्या ८४ नगरसेवकांसह ४ अपक्षांची एकत्र नोंदणी, शिवसेनेची गटस्थापना

26

नवी मुंबई – मुंबई-ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला असला तरी सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबईचीच. मुंबईचा महापौर कोण होणार याची गणिते राजकीय पंडित मांडत असले तरी सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या ८४ आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱया चार अपक्ष नगरसेवकांच्या गटाची स्थापना आज कोकण आयुक्तांसमोर करण्यात आली. शिवसेनेच्या विजयी शिलेदारांमुळे कोकण भवनचा परिसर  गजबजून गेला होता.

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कोकण विभागीय कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यानंतर सदर नगरसेवकांच्या नावाचा समावेश राज्य सरकारच्या राजपत्रात होतो. त्यासाठी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेला पाठिंबा देणाऱया चार अपक्ष नगरसेवकांनी आज बेलापूर येथील कोकण भवनात कूच केले.  या सर्व मिळून ८८ नगरसेवकांनी नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून आपल्या गटाची स्थापना केली. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे, महापौर स्नेहल आंबेकर, उपनेते यशवंत जाधव, विजय नाहटा, विशाखा राऊत, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, विभाग संघटक राजुल पाटील, किशोरी पेडणेकर, प्रवक्ते अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

शिवसेनेचा पाठिंबा वाढत राहणार

शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱया नगरसेवकांचे नोंदणीकरण आज झाले असून शिवसेनेचा पाठिंबा वाढत राहणार आहे, असा विश्वास यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला. महापौर शिवसेनेचाच होणार, असा विश्वास व्यक्त करतानाच ज्यांनी अनैसर्गिक व्यवहार केला, त्यांनी शिवसेनेला नैसर्गिक आणि अनैसर्गिक मैत्रीचे धडे देऊ नयेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

भगवा जल्लोष

शिवसेनेचे सर्वच नगरसेवक आज बसमधून म्हणून कोकण भवनमध्ये आले. त्यामुळे कोकण भवनचा परिसर गजबजून गेला आणि या परिसरात भगवा जल्लोष झाला. नोंदणीकरणाची आणि शिवसेना गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुमारे तीन तास सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या