पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा, कल्याण, डोंबिवलीत 8 ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू करणार

1610

‘कोरोना’ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रात अन्सारीचौक, चिकणघर, शास्‍त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मढवी, कोळसेवाडी, तिसगाव या आठ ठिकाणी ‘’तापाचे दवाखाने’’ सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यात  सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्‍वास घेण्‍यास त्रास व घसादुखी यासारखी लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींवरच तपासणी व उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला. ‘कोरोना’ ला हरवण्यासाठी  आवश्‍यक ती सर्व मदत करणार असलल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्‍थायी समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीत  प्रतिंबंधात्‍मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.  महापालिकेने फवारणी कामगारांना मास्‍क, हॅण्‍डग्लोज, सॅनीटायझर इ. आवश्‍यक सामुग्री पुरवावी असे निर्देश  यावेळी देण्यात आले. महापालिका सुरू करीत असलेल्या  क्लिनीक मध्‍ये सकाळी 9.30 ते 1.00 या वेळेत जाऊन तपासणी करून घेता येईल अशी माहिती पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

त्यांना शास्त्री रुग्णालयात दाखल करा
जे रूग्‍ण कोरोना बाधित रूग्‍णाच्‍या संपर्कात आले परंतू त्‍यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत अशा रूग्‍णांना शास्‍त्रीनगर रूग्‍णालयात दाखल करावे व लक्षणे आढळून आलेल्‍या रूग्‍णांना  नियॉन हॉस्‍पीटल, पडले गाव, शिळ रोड, डोंबिवली पूर्व या रूग्‍णालयात दाखल करावे अशा सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिल्‍या. या बैठकीस विविध अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या