विदर्भाच्या विकासाला शिवसेनेचा कायम पाठिंबाच! खासदार संजय राऊत यांची ग्वाही

33

सामना प्रतिनिधी,  नागपूर

विदर्भाच्या विकासाला, समृद्धीला शिवसेनेचा विरोध यापूर्वी कधी नव्हता आणि यापुढेही नसेल. आम्ही विकासासाठी विदर्भाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच विदर्भाच्या विकासाला विरोध करणारा पापी समजला जाईल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

आजवर कर्मवीर मा. सा. कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याचे नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे नमूद करतानाच विदर्भातील त्या नेत्यांना आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी विशेष लाभ उठवता आला नाही, अशी खंत खासदार राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

आता तर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने राज्याचा ‘कुबेर’ चंद्रपुरात आहे, असे सांगून ते म्हणाले की, विदर्भाचा विकास आता झपाट्याने होत आहे आणि तो झालाही पाहिजे. शिवसेना विकासाच्या बाजूने विदर्भाच्या कायम पाठीशी आहे. परंतु विकासाचे प्रकल्प उभे राहात असताना ज्यांची सुपीक जमीन या प्रकल्पांमध्ये जातेय, अशांचा विचारही व्हायला हवा, ही शिवसेनेची भूमिका आहे. आमचा संघर्ष त्यासाठी आहे.

दरम्यान, बुद्धलेणी भद्रावती परिसरात विकासाच्या कामांचे भूमिपूजन आज खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे आमदार बाळू धानोस्कर, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे उपस्थित होते.

बातमीचा आधार मजबूत असावा
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. पत्रकारांनी बातमी लिहिताना ती सत्यावर आधारित असावी, बातमीचा आधार मजबूत असावा, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले. वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाऱ्या पत्रकारितेचा दबदबा आजही टिकून आहे, असे त्यांनी सांगितले.

चिनी मालावर बहिष्कार घालावा
चीन वारंवार हिंदुस्थानला युद्धाच्या धमक्या देत आहे, मात्र हिंदुस्थानकडून कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नाही. केंद्र सरकारनेही याबाबत आक्रमक भूमिका घ्यावी आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या