‘मिंधे’ गटाचा खुनशी कारभार, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

विजय तरुण मंडळाच्या देखाव्याप्रकरणी न्यायालयात तोंडघशी पडलेल्या ’ईडी’ सरकारने आता रडीचा डाव सुरू केला आहे. मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना कल्याण पोलिसांनी दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावली आहे. सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाते. मात्र विजय साळवी यांच्यावरील राजकीय गुन्हे समाजासाठी घातक असल्याचा जावईशोध लावून त्यांना तडीपारीची नोटीस धाडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्यानंतर फुटीर आमदारांसह सरकार स्थापन केले. यावेळी शिवसेना कल्याण महानगरप्रमुख पदाची जबाबदारी असलेले निष्ठावंत विजय साळवी यांनी मिंधे गटाच्या कंपूत जाण्यास सपशेल नकार दिला. मी बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. मी गद्दारी करणार नाही असे साळवी यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या  विजय तरुण मंडळाने गणेशोत्सवात निष्ठsवर आधारीत ’मी शिवसेना बोलतेय’ हा चलचित्र देखावा तयार केला होता. मात्र शिंदे गटाच्या इशाऱयावरून पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी मंडळाने उच्च न्यायालयात दाद मागितली. विचार स्वातंत्र्यावर बंदी आणणे उचित नाही असे ठणकावून सांगत न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते.  याप्रकरणी ईडी सरकार तोंडघशी पडले असले तरी त्यांनी शिवसैनिकांचा छळ  सुरूच ठेवला आहे.कल्याण डोंबिवलीतील निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात गेलेले नाहीत. त्यातच विजय साळवी यांची 2 दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कल्याण पश्चिम आणि मुरबाड जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या मिंधे गटाच्या इशाऱयावरून केवळ खुन्नस काढण्यासाठी ‘ईडी’ सरकार त्यांना त्रास देत आहे. विजय साळवी कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर केवळ शिवसेनेने केलेल्या   राजकीय आंदोलनातील गुन्हे आहेत.

29 वर्षांचे राजकीय रेकॉर्ड

1993 पासून 2022 पर्यंत बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात विजय साळवी यांच्यासह शिवसैनिकांवर 15 गुन्हे आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय आंदोलनामुळे दाखल झाले असतानाही पोलिसांनी साळवी यांना ठाणे, रायगड आणि मुंबई जिह्यातून तडीपार करण्याची नोटीस धाडली आहे. सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या कार्यालयात त्यांना हजर राहून म्हणणे मांडण्याचे आदेशात म्हटले आहे.

 मग शिंदेनाही तडीपारीची नोटीस देणार काय?

माझ्यावर कोणत्याही क्रिमिनल केसेस नाहीत. शिवसेनेसाठी केलेल्या  आंदोलनासाठी हे  सर्व राजकीय गुन्हे आहे. यातील मलंगगड आंदोलन असो की एमएसइबीचे आंदोलन अर्ध्याहून अधिक गुह्यात  तेव्हा जिल्हाप्रमुख असलेले एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. अनेक आंदोलने त्यांनी सांगितली म्हणून केलेली आहेत. मग एकनाथ शिंदेनाही तडीपारीची नोटीस काढणार काय असा सवाल विजय साळवी यांनी केला. एकीकडे या आधी दाखल झालेले राजकीय गुन्हे सरकार मागे घेत असताना आमच्यासोबत  एकनाथ शिंदे  सरकार सूडबुद्धीने वागत आहे. या अन्यायकारक कारवाई विरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल.

विजय साळवी, कल्याण जिल्हाप्रमुख