संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील 67 हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन

बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेने 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनानंतर 67 हुतात्मे झाले. या सर्व हुतात्म्यांना आज सीमाभागात अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में’चा निर्धार मराठीभाषिक सीमावासीयांकडून करण्यात आला.

तत्कालीन केंद्रीय मंत्री मोरारजी देसाई हे संयुक्त महाराष्ट्र विरोधी म्हणून ओळखले जात होते. मुंबईचे वेगळे राज्य असावे, अशी त्यांची इच्छा होती. अशा मोरारजी आणि स. का. पाटील यांच्याविरोधात लढून मराठीभाषिकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला, पण बेळगावसाठी लढा सुरूच होता. मोरारजी देसाई 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत येत असल्याने त्यावेळी शिवसेनेकडून निवेदन देण्यासह निदर्शने करण्याचा निर्धार केला. यावेळी निवेदन स्वीकारले नाहीच; उलट पोलीस बळाचा वापर झाल्याने शिवसैनिक मोरारजींच्या गाडीकडे आडवे पडले. गाडीखाली सापडून एक शिवसैनिक गंभीर जखमी झाल्याने इतर शिवसैनिक आक्रमक झाले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने, पोलिसांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली. त्यामुळे शिवसैनिकांच्या संतापात आणखी भर पडली. आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीमार करून गोळीबार केला. शिवसेनाप्रमुखांची तुरुंगातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत ‘मुंबई बंद’ची घोषणा शिवसेनेने केल्याने मुंबईतील सारे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी तुरुंगातूनच आवाहन केल्याने मुंबई शांत झाली. मात्र, या आंदोलनात एकूण 67 शिवसैनिकांनी सीमाभागातील मराठी जनतेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च हौतात्म्य पत्करले. दरवर्षी या हुतात्मा शिवसैनिकांना सीमाभागात अभिवादन करण्यात येते.

मराठीभाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव येथील सम्राट अशोक चौकात आज या सर्व हुतात्म्यांना मराठी भाषिक सीमावासीयांसह शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मालोजी अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर, महेश टंकसाळी, दत्ता पाटील, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, बाळासाहेब डंगरले, शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, शुभम शेळके, श्रीकांत कदम, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर यांच्यासह शिवसैनिक तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.