घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे? खणखणीत सवाल करत आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

घटनाबाह्य मुख्यमंत्री सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन, एअर बस प्रकल्प, सोलार एनर्जी पार्क, बल्क ड्रगपार्क गेले कुठे तर गुजरातमध्ये, गद्दार कुठे गेले होते? गुजरातमध्येच. म्हणजे हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की गुजरातचे? हे त्यांनाही कळलेलं नाही आणि आपल्यालाही नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी खरे मुख्यमंत्री नक्की कोण हे त्यांचंच ठरलेलं नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. उद्योग गुजरात किंवा अन्य राज्यात आल्यास त्याचं दु:ख नाही, मात्र महाराष्ट्रात येणार उद्योग तिथे पाठवण्यात आले याचं दु:ख असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. गेल्या सहा महिन्यात तीन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्यांना दिल्या गेल्या, कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्राऐवजी दुसरीकडे देण्यात आली, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. यांनी महाराष्ट्राला कामधंद्याला लावलं पण महाराष्ट्राची कामं केली नाही, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी नांदगाव येथे शिवसंवाद यात्रेनिमित्त भव्य सभा घेतली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारची अक्षरश: पिसं काढली. नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही हात घातला. आज शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे की ते पुढच्या पिढीला शेती करण्याचा आग्रह करण्यास धजावत नाहीत, मात्र त्यांनी शेती नाही केली तर पोटापाण्यासाठी नोकऱ्या तरी कुठे आहेत? इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत, मग हे इथले तरुण काय करणार असा प्रश्न त्यांनी विचारला.

आजच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचा हवाला देत ते म्हणाले की, ’26 हजार कोटींची गुंतवणूक येणार होती, ती देखील बाहेरच्या राज्यात मध्यप्रदेशात गेली आहे. बरोबर रचना कशी केली आहे ते बघा. की महाराष्ट्रात चांगलं सरकार चाललेलं, मजबूत सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, जनतेचं – महिलांचं – तरुणांचं – सामान्य नागरिकांचं सरकार होतं ते पाडलं, उद्धव ठाकरेंच्या पाठीत 40 खंजीर खुपसले, आमच्या पाठीवर 40 वार केले करी या राज्यात उद्योग आणले नाहीत. जिथे निवडणुका आहेत तिथे रोजगार, उद्योग नेले जातात पण महाराष्ट्रासाठी काही केलं जात नाही’, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

‘आपलं सरकार असताना पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा. कुठल्याही अटी-शर्तींशिवाय कर्जमुक्ती दिली. हे आपण करून दाखवलं होतं, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली. स्वत:साठी 50 खोके घेणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना द्यायला 50 हजार रुपयेही नाहीत’, असा जबर हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.

या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक लोक मला मार्गात थांबवतात, भेटतात, आम्ही आपल्या सोबत शिवसेनेसोबत असल्याचं सांगतात. हेच वातावरण संपूर्ण राज्यात आहे. आज महाराष्ट्रात फिरताना मला जाणवायला लागलं आहे की, हे घटानाबाह्य सरकार, अल्पायु सरकार आणि तुम्ही लिहून घ्या पुढल्या दोन तीन महिन्यात हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. हे थोडे दिवस मजा मारत आहे. पैसे खाणं जोरात सुरू आहे, ओके होणं जोरात सुरू आहे पण जिथे जिथे आम्ही जात आहोत तिथे तिथे दोन्ही सभांमध्ये मला फरक जाणवायला लागला आहे. आपल्या शिवसेनेचे कार्यक्रम जिथे जिथे होतात तिथे मग कुणाचेही कार्यक्रम असो सगळीकडे भरगच्च गर्दी असते, जमलेली लोकं असतात, तुफान गर्दी असते, स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात स्वत:हून येत असतात. पैसे देऊन आणलेले नसतात. इथे कुणी पैशाने आलेलं आहे का? खोके वालं कुणी आहे का? धोक्यानं आलेलं कुणी आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना करताच नाही… नाही… असा प्रतिसाद जमलेल्या लोकांकडून आला.

पैसे देऊनही गद्दारांच्या सभांना पाहिजे तशी गर्दी नाही!

पलिकडे गद्दारांच्या सभा बघितल्या अगदी मुख्यमंत्र्यांच्या सभा जरी बघितल्या तर खोके अनेक वाटले जातात, पण गर्दी जशी व्हायला पाहिजे तशी कुठेही गर्दी होत नाही, असं ते म्हणाले. एका बाजूला शिवसेनेसोबत असलेले निष्ठावंत, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि माझ्यावर प्रेम करणारे राजकीय विचार नसलेले नागरिक येतात. ज्यांनी महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण नाकारलेलं आहे असे लोक सोबत येतात. पण दुसऱ्या बाजुला घोळका असतो गद्दारांचा, तो तात्पुरता आहे आणि ज्यादिवशी हे सरकार पडेल त्यादिवशी हे लोक जाणार कुठे गायब कुठे होतील हे या गद्दारांना कळणार सुद्धा नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.

त्याचवेळी दोन्ही सभांमध्ये 50 खोके एकदम ओके ही घोषणा मात्र होते, असं म्हणत त्यांनी गद्दारांना चिमटा घेतला. हे साम्य असलं तरी आम्ही आमच्या सभांमध्ये लोकांना पकडायला लावत नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.

गद्दारीला आठ महिने होऊन गेले आहेत. जिथे जिथे हे गद्दार जातात तिथे तिथे या लोकांना पळवलं जातं. अक्षरश: हे गद्दार पळायला लागतात. पण अजूनही एकाही गद्दारानं पुढे येऊन हे सांगितलं नाही की आम्ही खोक्याला हात लावलेला नाही, असंही ते म्हणाले.

हे निर्लज सरकार!

अधिवेशनावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर आम्ही घोषणा देत होतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मागणी करत होतो. ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्च्या खाली करा म्हणत होतो. तिथे काही गद्दार समोर आल्यानंतर 50 खोके एकदम ओके अशा घोषणा सुरू झाल्यावर गद्दारांनी पुढे येऊन तुम्हाला पाहिजे का असं विचारलं. हे असं निर्लज सरकार हे आपल्या राज्यात बसलेलं आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे, तात्पुरता सरकार आहे. पण दु:ख या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रातील एकही व्यक्ती म्हणू शकत नाही की हे सरकार माझं सरकार आहे. समाजातला एकही घटक असा नाही की हे सरकार माझं सरकार आहे. ना शेतकरी, ना महिला, ना तरुण, ना बेरोजगार, ना पोलील, ना प्रशासकीय अधिकारी सांगू शकतात की हे माझं सरकार आहे. हे सरकार गद्दारांचच सरकार आहे, गद्दार सोडलं तर कुणाचं सरकार नाही, असं ते म्हणाले.

तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र मागे चाललेला आहे. प्रत्येक क्षेत्रात मागे नेण्याचं काम चाललं आहे. मुख्यमंत्री गेल्या सहा सात महिन्यात कमीत कमी 20 वेळा दिल्लीला गेले असतील. कधी लपून छपून तर कधी उघडपणे जातात पण हे सगळं झालं तरी अशी घोषणा झाली नाही की मी दिल्ली गेलो आणि दिल्लीकडून हे मागून आलो. आमच्या राज्यातून सहा मोठे उद्योग का नेले गेले हा जाब दिल्लीला विचारला नाही, आमचे जीएसटीचे पैसे कधी येणार हा प्रश्न विचारलेला नाही, केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय होतं आणि का काही दिलं नाही हे विचारलं नाही, पण जेव्हा जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा विचारलं की माझं काय होणार माझं काय होणार? केवळ स्वत:साठी जाणारे कदाचित हे पहिले मुख्यमंत्री असतील. हे स्वत:साठी दिल्लीला गेले पण महाराष्ट्रासाठी कधी दिल्लीला गेले नाहीत. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचं काम सुरू आहे, पण दिल्लीसमोर स्वाभिमानानं उभं राहण्याचं काम यांनी कधीही सुरू केलेलं नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणजे नाही, त्याआधीच सरकार कोसळणार! आदित्य ठाकरेंचा विश्वास

‘हे घटनाबाह्य सरकार आहे. यात महिलांना स्थान देण्यात आलेलं नाही. तेव्हा लिहून घ्या, या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणजे नाही आणि त्याच्या आधी हे सरकार कोसळणार, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला.