पोलीस अपयशीच, शिवसैनिक आक्रमक झाल्याने दंगल थांबली! : दिवाकर रावते

27

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहराच्या राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज आणि गांधीनगर या चार भागामध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती. दंगल रोखण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलले आणि त्यामुळेच दंगल नियंत्रणात आली. दंगल थांबविण्यासाठीच शिवसेनेला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. या जिगरबाज शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो, असे स्पष्ट आणि परखड मत शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

दंगलग्रस्त भागाची पाहणी करून आल्यानंतर रावते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील चार भागांमध्ये दंगली झाल्या असून त्या पूर्वनियोजित होत्या. या दंगलीमध्ये जून्या इमारती आणि दुकांनाना टारगेट करण्यात आल्याचे निदर्शनास आले. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून रस्त्यावरील अतिक्रमणांवरुन वाद सुरू होता.पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करीत होती असा सवाल उपस्थित करत ती यंत्रणा गाफिल राहिल्यामुळेच दंगल उसळली असल्याचा आरोप रावते यांनी केला. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले,सभागृहानेता विकास जैन,उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, रमेश इधाटे, पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिसांनी योग्य माहिती घ्यावी, मुख्यमंत्री गंभीर दिसत नाहीत
दंगलखोरांवर कारवाईच्या नावाखाली विनाकारण कोणालाही अटक न करता पोलिसांनी आधी योग्य ती माहिती घ्यावी, अशी अपेक्षा रावते यांनी व्यक्त केली. मूळातच संभाजीनगर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जाते. तेव्हा पोलीस आयुक्तालयातील दंगाकाबू पथक या दंगलीच्या वेळी कोठे गेले होते, असा सवालही त्यांनी केला. राज्यात कोठेही दंगल झाली तरी मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालून चौकशी करतात. संभाजीनगरच्या दंगलीकडे मात्र ते फारसे गांभीर्याने पाहत नाहीत असे दिसते आहे, असा टोलाही रावते यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या