शिवसेना उपनेते, माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

महापौरपदाची हॅटट्रिक करणारे शिवसेनेचे उपनेते, कोळी समाजाचे नेते व माजी आमदार अनंत तरे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा जागरूक, लढवय्या लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी अनंत तरे यांना कोरोनाची लागण झाली होती. ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सहा दिवसांतच तरे यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याआधीच त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. त्यानंतर ते कोमात गेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र आज सायंकाळी 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तरे यांच्या पश्चात पत्नी हेमलता, मुलगा जयेश, मुली डॉ. जस्मीन तरे-राजके व डॉ. दक्षा तरे, भाऊ माजी नगरसेवक संजय तरे यांच्यासह जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ठाणे शहराच्या राजकीय तसेच विकासात्मक जडणघडणीमध्ये अनंत तरे यांचा मोठा वाटा होता. बीएस.सी ऑनर्स असलेल्या तरे यांनी विद्यार्थी दशेतूनच राजकारणाचे धडे घेतले. कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना झुनझुनवाला कॉलेजमध्ये खो-खोचे कॅप्टन व जिमखाना सेक्रेटरी पदही सांभाळले. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत असताना ते स्थानीय लोकाधिकार समितीच्या संपर्कात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ओजस्वी भाषण ऐकून त्यांचे आयुष्यच बदलले. तरे यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

नगरसेवकपदापासून कारकीर्द सुरू

1992 च्या महापालिका निवडणुकीत आझादनगर भागातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून अनंत तरे शिवसेनेचे नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 31 मार्च 1993 मध्ये ते पहिल्यांदा ठाण्याच्या महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतर  1994 आणि 1995 असे सलग तीन वेळा ठाण्याच्या महापौरपदावर विराजमान होण्याची संधी अनंत तरे यांना मिळाली. त्यांनी महापौरपदाची हॅटट्रिक करून विक्रमच प्रस्थापित केला.

कोळी समाजाचे नेतृत्क

अनंत तरे यांनी राज्यातील कोळी समाजाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. ते महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्षही होते. तसेच विविध प्रश्नांवर आंदोलनेदेखील केली. ठाण्यात कोळी भवन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जात प्रमाणपत्र तसेच कोळी समाजाच्या समस्यांसाठी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. कार्ला येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. देवस्थानच्या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. देवस्थान ट्रस्टमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा अनंत तरे यांनी न्यायालयातही लढा दिला.

विधान परिषदेतही ठसा उमटकला

ठाण्यातील नगरसेवक, महापौरपदाचा मोठा अनुभव गाठीशी असल्याने तसेच दांडगा जनसंपर्क व अभ्यासूवृत्ती यामुळे शिवसेनाप्रमुखांनी अनंत तरे यांना विधान परिषदेवर पाठवले. 2000 ते 2006 अशी सहा वर्षे त्यांनी विधान परिषदेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यानंतर रायगड जिह्यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनाप्रमुखांनी तरे यांची शिवसेनेच्या उपनेतेपदीही नियुक्ती केली. 2014 मध्ये ते रायगड जिह्याचे तर 2015 मध्ये पालघर जिह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते.

न्याय्य हक्कासाठी संघर्ष करणारा नेता

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या तरे यांनी कोळी समाजाला न्याय्य हक्क मिळावा यासाठी प्रखर संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळे एकवीरा देवीचा निस्सीम भक्त तसेच विधिमंडळाच्या सभागृहात व बाहेरही अनेक प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता हरपल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. अनंत तरे यांचे निधन वेदनादायी असून ठाण्यात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा व सर्वांना हवाहवासा नेता गमावला अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे

गर्दी न करण्याचे आवाहन

अनंत तरे यांचे पार्थिव आनंद पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून राबोडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गर्दी करू नये असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या