नामांतराचे श्रेय लाटले, पण नावे अजूनही जुनीच; शिवसेनेचा भाजपला रेल्वे स्थानकांच्या जुन्या नावांवरून संसदेत टोला

मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. त्यामुळे शेवटी ही नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, याचे श्रेय भाजपने घेतले. मात्र, रेल्वे स्थानकांच्या नामांतराचे श्रेय लाटले तरी अजूनही कागदावर आणि रेल्वे स्थानकांवरही जुनीच नावे अस्तित्वात आहेत, असा टोला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी संसद अधिवेशनात केंद्रातील भाजप सरकारला लगावला.

दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिबेशन सुरू असून आज लोकसभेत रेल्वे सुधारणा विधेयक- 2024 वर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांनी रेल्वे विभागाकडील प्रलंबित मागण्यांची यादी सादर केली.

महाराजांच्या पुतळ्यासह बोर्ड स्वायत्ततेचा प्रश्न प्रलंबित

हिंदुस्थान रेल्वेचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांचे रेल्वे स्थानकाला नाव देण्याची मागणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी, रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर वसलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनासंदर्भात धोरण तसेच रेल्वे बोर्डाच्या स्वायततेबाबतही बोर्ड स्वतंत्र राहणार की त्यात सरकारचा हस्तक्षेप राहणार, असे महत्त्वपूर्ण प्रश्न अरविंद सावंत यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केले.