संभाजीनगरमध्ये स्कूल बसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग

523

गतिमंद मुलांच्या शाळेच्या बसमध्ये घुसून एका टोळक्याने अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना संभाजीनगर येथे घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारात त्या टोळक्यासोबत बसचा चालक देखील सहभागी असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळीकडून मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सर्रास सुरू असून ते मुलींचा विनयभंग करताना चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते.

या भयंकर प्रकरणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडित मुलींची चौकशी त्यांना समजेल अशा भाषेत आणि शिक्षकांच्या माध्यमातून केली गेली. या प्रकरणी शिवसेना नेत्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांना पत्र लिहून त्यांना पुढील एका महिन्यात चार्जशीट दाखल करुन सक्षम महिला अभियोक्ता देण्यासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश देत आहे.

तसेच या पत्रातून त्यांनी अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी काही सूचना देखील केल्या आहेत.

– शाळेतील स्कुल बस मध्ये असणारे चालक यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. याबाबत वारंवार परिवहन आणि शाळांना सूचना दिल्या आहेत. परंतु याबाबत अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. चालकांवर पूर्वी काही गुन्हे नोंद असतील त्यांना स्कुल बस चालविण्याचा परवाना देण्यात येऊ नये.

– बसचालकाने अन्य परक्या मुलांना बसमध्ये येऊ दिले व मुलीला मारहाण करुन सामुहिकरित्या ते विकृत आनंद घेत होते. असे प्रकार होऊ नयेत म्हणुन शाळा बसेसमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला परिचर असाव्यात असा नियम आहे तोही पाळला गेलेला नाही.

– सिव्हिल ड्रेसमध्ये महिला पोलीस कर्मचारी शाळांच्याकडे जाणाऱ्या बसेस,एस.टी. यात अल्पकाळ परंतु अचानक ठेवण्यात याव्यात. त्यातुन या प्रकारांना जरब बसेल.

– मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ पोलिसांनी तयार करून त्यांना मदत मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा.

– पीडित मुलींचे समुपदेशन करण्यात यावे.

आपली प्रतिक्रिया द्या