आशीर्वाद देणाऱ्यांमध्ये मी देव बघतो, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

91
aditya-rally

सामना प्रतिनिधी । नाशिक

महाराष्ट्रव्यापी जनआशीर्वाद यात्रा किती किलोमीटरची होईल, हे मी मोजत नाही. यात मिळणारे शेतकरी, महिला, कष्टकरी, विद्यार्थी यांचे आशीर्वादच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यात मी देव बघतो, त्यामुळे ही यात्रा माझ्यासाठी तिर्थयात्रा आहे, अशी भावना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निफाड, येवला मतदारसंघांतील विजयी संकल्प मेळाव्यात व्यक्त केली. उद्याची शिवशाहीची भगवी सत्ता तुम्हाला न्याय-हक्क मिळवून देणारी असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जनआशीर्वाद यात्रा तीन दिवसांचा प्रवास करून चौथ्या दिवशी रविवारी निफाड व येवल्यात दाखल झाली. निफाड विधानसभा मतदारसंघातील चितेगाव फाटा येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात, त्यानंतर येवला येथील आसरा लॉन्समध्ये आदित्य ठाकरे यांनी विजयी संकल्प मेळाव्यात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाशी संवाद साधला. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र भगवा करायचा आहे, यासाठी शिवसैनिकांनी गावोगावी भगवा पोहचविण्याचे काम करावे. नवा महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी मला तुमची साथ, सोबत आणि आशीर्वाद द्या. तुमचे न्याय्यहक्क मिळवून देणारे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या पाठिशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला 21 प्रदूषित नद्या स्वच्छ करायच्या आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हे काम हाती घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, पूर्वेश सरनाईक, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, जिल्हाप्रमुख सुहास कांदे आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक उपस्थित होते.

तीन वर्षे मोफत खते, बी-बियाणे द्या – रामदास कदम

राज्यातील शेतकऱयांच्या आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी शेतकऱयांना तीन वर्षे मोफत खते व बी-बियाणे द्यावीत. शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून करावीत, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. विम्याची नुकसानभरपाई आणि कर्जमुक्ती ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली, असे सांगून त्यांनी राज्यात युती होणार आणि युतीचाच मुख्यमंत्री होणार, असेही स्पष्ट केले.

जनआशीर्वाद यात्रा निफाड, येवल्यात; ठिकठिकाणी भगवे स्वागत!

जनआशीर्वाद यात्रेचे रविवारी चितेगाव फाटा, चांदोरी, निफाड चौफुली, निफाड, विंचूर चौफुली आणि येवला मतदारसंघांत ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यामुळे परिसरात भगवे चैतन्य निर्माण झाले होते. चितेगाव फाटा येथे आदित्य ठाकरे यांचे बैलगाडीतून स्वागत करण्यात आले, तर येवल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांनी त्यांची धान्यतुला केली.

आपली प्रतिक्रिया द्या