राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या सामाजिक वास्तूंवर पालिकेची टाच

प्रशासनाला हाताशी धरून शिंदे गटाची निष्ठावान शिवसैनिकांवर दडपशाही सुरूच आहे. या दडपशाहीने आता हद्द केली असून ठाण्यात शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या निधीतून उभारलेल्या सामाजिक वास्तूंवर ठाणे महानगरपालिकेने टाच आणली आहे. या वास्तू रेडिरेकनर दराने भाडेतत्त्वावर देण्याचे कारण दाखवत निसर्ग संस्कार भवन, चैत्रगौरी महिला मंडळ, नागेश्वर स्पोर्टस् क्लब तसेच व्यायामशाळेला सील ठोकण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोणतीही आगाऊ सूचना न देता आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली असून शिवसैनिकांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हेही दाखल केले आहेत. अशा पद्धतीने सूडबुद्धीने सत्तेचा गैरवापर करणाऱ्या शिंदे सरकारविरोधात ठाणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात शिवसैनिकांचे वर्चस्व असलेल्या सामाजिक वास्तू हेरून त्रास देण्याचे सत्र महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक समिधा मोहिते व अनुजा पांजरी यांच्या झुणका-भाकर केंद्रांना तडकाफडकी सील ठोकण्यात आले. नंतर मोहिते यांच्या मुलाचे हॉटेलदेखील बंद पाडण्यात आले. आता शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मदतीचा हात दिलेल्या वास्तूंना टार्गेट केले आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एक मजल्याची वास्तू आहे. तेथे चैत्रगौरी महिला मंडळामार्फत नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली  महिलांना स्वयंरोजगारात स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. महासभेच्या मान्यतेनुसार  नाममात्र दराने ही वास्तू महापालिकेने उपलब्ध करून दिली. खासदार राजन विचारे यांचा निधीही त्यासाठी वापरला होता.

निसर्ग संस्कार भवनाची जागा आता आम्हाला रेडिरेकनर दराने भाडेतत्त्वावर द्यायची असल्याचे सांगून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी थेट ही वास्तूच ताब्यात घेतली आहे. याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. ठाणेकरांच्या फिटनेससाठी  कोलबाड येथेही सावरकर मैदानात तळ अधिक एक मजल्याची वास्तू नागेश्वर हेल्थ अॅण्ड स्पोर्टस् क्लबसाठी भाडय़ाने देण्यात आली होती. हे स्पोर्टस् क्लब खासदार राजन विचारे यांच्या विशेष अनुदानातून उभे राहिले आहे. मात्र भाडेकराराची मुदत संपल्याचे सांगून या वास्तूलादेखील स्थावर मालमत्ता विभागाने सील ठोकले.

एकतर्फी कारवाई

ठाणे महापालिकेच्या भूखंडावरील आमदार, खासदार निधीतून शहरात बांधण्यात आलेल्या शेकडो समाज मंदिरे, व्यायामशाळा व वास्तू विविध संस्थांना नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या वास्तूंना महापालिकेचाही निधी मिळाला आहे. एका याचिकेचा निकाल देताना न्यायालयाने अशा वास्तूंना रेडीरेकनरनुसार दर आकारावेत, असे निर्देश काही वर्षांपूर्वी दिले होते. त्यामुळे नाममात्र दराने सुरू असलेल्या अनेक शैक्षणिक व आरोग्य संस्था अडचणी येण्याची शक्यता होती. म्हणून ठाणे महापालिकेने महासभेत स्वारस्य अभिव्यक्ती सूचनेनुसार संस्थांना देण्यात येणारी सवलत कायम असावी असा ठराव केला होता. मात्र एकतर्फी कारवाई करताना शिवसेना व मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांच्या संस्थांच्या वास्तूंनाच पालिकेने ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

कितीही जुलूम करा, झुकणार नाही

महिलांना सक्षम, सबळ बनवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा केल्याने चैत्रगौरी मंडळाची वास्तू उभी राहिली. त्याचे उद्घाटन होण्याआधीच ही वास्तू महापालिकेने ताब्यात घेतली. आम्ही मातोश्री आणि ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच शिंदे गटाने पालिकेच्या नथीतून तीर मारत ही कारवाई केली. निव्वळ सूडबुद्धी, सत्तेचा गैरवापर आणि दबावतंत्र ठाण्यातील शिवसैनिकांवर सुरू आहे. ही बाळासाहेबांची, दिघेसाहेबांची शिकवण नाही. याच्या मागे कुणाचे डोके आहे ? ही कोणती  हुकूमशाही..महिलांवर सूडबुद्धीने कारवाई करणे ही शरमेची गोष्ट आहे.  कितीही जुलूम केले तरी आम्ही झुकणार नाही. मातोश्रीशी बेईमानी करणार नाही.

नंदिनी विचारे (शिवसेना माजी नगरसेविका)

फक्त 21 हजारांसाठी व्यायामशाळा बंद केली

ठाण्याच्या सावरकरनगर भागातदेखील खासदार निधीमधून व्यायामशाळा बांधली होती. त्याचे उद्घाटन स्वतः शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केले होते. सावरकर रहिवासी संघामार्फत ही व्यायामशाळा चालवली जाते. कोरोना संकटामुळे भाडे देणे शक्य झाले नाही. 89 हजार रुपये भाडे थकले होते. मात्र त्यातील काही रक्कम  व्यायामशाळा चालवणारे राजू शिरोडकर यांनी भरली. आता फक्त 21 हजार 517 रुपये भाडे बाकी होते. तरीही महापालिकेने ही व्यायामशाळा बंद करून जागा आपल्या ताब्यात घेतली.