शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांना ‘डॉक्टरेट’!

1591

अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ पुणे यांच्याकडून शिवसेना उपनेते, आमदार उदय सामंत यांना ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. उदय सामंत यांच्या गेल्या 20 वर्षातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ पुणे यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2020 मध्ये आमदार उदय सामंत यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची ओळख आमदार डॉ.उदय सामंत अशी होणार आहे़

आमदार उदय सामंत हे गेली 20 वर्ष राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. युवकांचे नेतृत्व करत असताना युवा महोत्सव, क्रिकेट स्पर्धांसह शैक्षणिक उपक्रम त्यांनी सुरु केले होते. 2004 साली ते सर्वप्रथम आमदार झाले. त्यानंतर सलग चारवेळा आमदार होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. 2013 साली ते राज्यमंत्रीही झाले. 2018 ला म्हाडाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. त्याचबरोबर राजकारणातही विविध पदांवर काम करत त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहुमान दिला आहे़.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड या राजकीय नेत्यांनादेखील यापूर्वी या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली आहे. आमदार उदय सामंत यांना ही डॉक्टरेट मिळाल्याने रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या