महाराष्ट्रातील शेतकऱयांना 40 हजार कोटींचे पॅकेज द्या, लोकसभेत शिवसेनेची आग्रही मागणी

748

अवकाळी पावसाने महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला असून 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये पिके भुईसपाट झाली आहेत. जगायचे कसे, हा प्रश्न अन्नदात्या शेतकऱयापुढे आहे. मच्छीमारांचीही अवस्था शेतकऱयांप्रमाणे दयनीय झाली आहे. राज्यातील ही भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱयांना 40 हजार कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने लोकसभेत केली.

शेतकऱयांच्या प्रश्नांवर गुरुवारी लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी मराठीतून भाषण करत राज्यातील शेतकऱयांच्या दुरवस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले अवकाळी पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात खरीप हंगामातील डाळिंब, द्राक्षे या नगदी पिकांसह सोयाबीन, ऊस आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र सभागृहापुढे मांडले.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी विविध ठिकाणी दौरे केले. शिवसेना पक्षीय पातळीवर आणि मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे शेतकऱयांना मदत करतच आहेत, मात्र अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनेही कसलीही खळखळ न करता राज्यातील शेतकऱयांसाठी 40 हजार कोटींचे पॅकेज द्यावे अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. सांगली व कोल्हापूर जिह्यात झालेल्या भीषण पावसामुळे झालेल्या नुकसानीची अजूनही गरजूंना मदत मिळालेली नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

शेतीसाठी हेक्टरी 20 हजार तर बागायतीसाठी 30 हजार रुपये द्या!
शेतीसाठी हेक्टरी किमान 20 हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी 30 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत केली. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सर्व फी माफ करावी. पीक कर्जाचे पुनर्गठन करून संपूर्ण व्याज माफ करण्यात यावे, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस पुढील वर्षाचे पीक उत्पन्न मिळेपर्यंत कर्जवसुली स्थगित करावी, आदी मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या