खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेची ‘सप्तऋषी वारी’ पूर्ण

933

सामना प्रतिनिधी । मेहकर (बुलढाणा)

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत आज तालुक्यातील सप्तऋषी वारी केली.

तालुक्यात सात ऋषींची ठिकाणे असून श्रावण महिन्यात हजारो भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. सातही ठिकाणी ऋषीची मूर्ती व महादेवाचे मंदिर आहे. सातही ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती व प्रभू श्रीराम सुध्दा या परिसरात थांबले होते असे सांगितले जाते. बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील भक्त तिसर्‍या श्रावण सोमवारी रात्री 50 कि.मी. पायी वारी करून सातही ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. निसर्ग रम्य परिसरात असलेली ही ठिकाणे श्रावण महिन्यात भक्तांना मोहीत करतात. प्रत्येक ठिकाणी गोमुख, नैसर्गिक पाण्याचे साठे, झरे हे दृश्य आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजता खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर व शिवसेनेचा वाहनांचा ताफा सर्व प्रथम वडाळी येथे पोहोचला. तिथे महादेवाचे दर्शन घेऊन वसिष्ठ ऋषीच्या मूर्तीचे दर्शन घेतले, नंतर उटी घुटी येथे बगदालभ्य ऋषी, गोमेधर येथे गौतमेश्वर ऋषी, वरवंड येथे वाल्मिकेश्वर ऋषी, पाथर्डी येथील पाराषर ऋषी, द्रुगबोरी येथील दुर्वास ऋषी व शेवटी सायंकाळी साडेसहा वाजता विश्वी येथील विश्वामित्र ऋषीच्या मूर्तीचे व महादेवाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी आरती करण्यात आली. यावेळी राज्यात काही जिल्ह्यात पुरामुळे जे जनजीवन विस्कळीत झाले आहे ते लवकर पूर्व पदावर येऊ दे. राज्यातील व जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृद्ध होऊ दे, अशा प्रार्थना करण्यात आल्या. या वारीत उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, सभापती माधवराव जाधव, बी. ए. वानखेडे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, उपसभापती सुपाजी पायघन, जि. प. सदस्य राजेंद्र पळसकर, तेजराव जाधव, पं.स. सदस्य निंबाजी पांडव, राजू घनवट, सुरेश मवाळ, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीपबापू देशमुख, नगरसेवक रामेश्वर भिसे, रवी रहाटे, गणेश लष्कर, संचालक सुरेश काळे, रामेश्वर बोरे, केशवराव खुरद, राजू चव्हाण, भास्करराव राऊत, नितीन राऊत, भगवान बाजड, प्रमोद काळे, सरपंच अरूण दळवी, मोतीचंद राठोड, सागर कडभणे सह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या