बारसूमध्ये मिश्रा, गुप्ता, शहांना कुणी आणले? 144 परप्रांतीयांनी खरेदी केल्या जमिनी; विनायक राऊतांनी दाखवली यादी

बारसू परिसरातील 1537 एकर जमीन 309 जणांनी खरेदी केली आहे. त्यापैकी 144 जण हे परप्रांतीय आहे. बारसूमध्ये मिश्रा, गुप्ता, शहा आले कुठून? त्यांना जमिनी विकल्या कुणी असा सवाल शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित करताना केवळ रिफायनरीसाठी उद्योग खाते घेऊन उदय सामंत परप्रांतीयांच्या झोळ्या भरण्याचे काम करत आहेत. उदय सामंत रिफायनरीची दलाली करत आहेत असा आरोप विनायक राऊत यांनी केला. पत्रकार परिषदेत बारसू मध्ये जमीन खरेदी करणाऱ्या परप्रांतीयांची यादीच त्यांनी दाखवली.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी बोलायला वेळ नाही, मात्र मुंबईत रिफायनरीच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला उद्योगमंत्र्यांना वेळ आहे. रिफायनरी तर 10 वर्षात होणार नाही मात्र ज्यांनी जमिनी खरेदी केल्या त्या लॅण्ड माफियांसाठी ही सर्व धडपड सुरू आहे. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे जे झाले तेच रिफायनरीचे होणार असे सुतोवाच राऊत यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग घोसाळे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी आणि तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.

शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्राचे तुकडे

भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम करत आहे. पण शिवसेना गप्प बसणार नाही. महाराष्ट्र हडप करू पहाणाऱ्या कर्नाटकला धडा शिकवू, असा इशारा राऊत यांनी दिला. आज राज्यातील सरकार सांगली आणि अन्य परिसरात मराठी आणि कन्नड लोकांमध्ये द्वेष पसरविण्यांवर प्रतिबंध करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्वांचे हिशोब करू!

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. त्यावर कडक शब्दात उत्तर देताना राऊत म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांकडून दबाव टाकल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. पण हे सरकार दोन-तीन महिनेच काढेल, पुढे मग या सर्वांचाच आम्ही हिशोब करू.