भारतमातेशी द्रोह करणाऱ्याला फासावर लटकवणारच!

सामना ऑनलाईन । नाशिक

भारतमातेशी जो द्रोह करील तो कोणीही असला तरी त्याला आम्ही फासावर लटकवणार म्हणजे लटकवणारच, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथे केली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासारखे वीर जन्माला आले नसते तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेच्या खुर्चीचे स्वप्नसुद्धा पाहू शकले नसते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सावरकरांइतक्या हालअपेष्टा तुरुंगामध्ये भोगल्या असतील तर नेहरूंना वीर जवाहरलाल नेहरू असे म्हणायला मी तयार आहे, असे आव्हानही त्यांनी राहुल गांधी यांना दिले.

महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी सायंकाळी नाशिक येथील सभेत उद्धव ठाकरे हे बोलत होते. ज्याच्यात खुमखुमी असेल त्यांनी 29 तारखेला टक्कर देऊनच बघावी. शिवसेना-भाजपची युती ही काही घेण्यासाठी नाही तर देशाला देण्यासाठी झाली आहे. छगन भुजबळ यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काहीजण मफलरीमधून गळा काढतायत, आमचा दोष नसताना अटक झाली असा दावा करतायत, पण तुम्ही शिवसेनाप्रमुखांना अटक करायला का निघाला होता याचे उत्तर द्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

देशाला खंबीर नेतृत्व लाभलेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीला मतदान करा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी उत्तराखंडचे पर्यटन विकासमंत्री सतपाल महाराज, पालकमंत्री गिरीश महाजन, उपनेते बबनराव घोलप, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

उद्या तुम्ही चुलते-पुतणे तुरुंगात जालच
धर्मांधांनी हैदोस घातला तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मुंबई वाचवली, हिंदुत्वाचं रक्षण केलं तो त्यांचा गुन्हा होता का? असे सांगून ते म्हणाले की, तुम्ही कर्माची फळं भोगताय. आज जामिनावर आहात, उद्या तुम्ही चुलते-पुतणे तुरुंगात जालच. काँग्रेस काय अन् राष्ट्रवादी काय यांनी घोटाळेच घोटाळे केले, आदर्श घोटाळा, बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, बोफोर्स घोटाळा अशा या घोटाळेबाज बकासुरांना तुम्ही निवडून देणार आहात का, असा सवाल त्यांनी केला.