जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार! उद्धव ठाकरेंचा शब्द

6881

नांदेड / लातूर / परभणी

पीकविमा नाही, कर्जमाफी नाही… आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. पण तुमच्या आत्महत्येने प्रश्न सुटणार आहे का? आणि कशासाठी जीव द्यायचा? संकट कितीही गंभीर असो, काळजी करू नका… शिवसेना तुमच्यासोबत आहे. जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर सर्वात अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार, त्याचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच! असा आश्वासक शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. ओल्या दुष्काळामुळे खरीप हातचा गेला आहे. रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ 25 हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास निसर्गाने हिरावून नेला आहे. खायला अन्न नाही, जनावरांना चारा नाही… रब्बीचा हंगाम तोंडावर आहे. दलदल झालेल्या शिवाराची मशागत कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अगोदर कोरडा आणि आता ओल्या दुष्काळाच्या दहशतीने शेतकरी धास्तावून गेला आहे. पीकविमा मिळत नाही, कर्जमाफीचा खडकू पदरी पडला नाही. बँकांनी वसुलीसाठी सावकारी चालू केली आहे. चोहोबाजूने कोंडी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नांदेड, परभणी, लातूर तसेच बीड जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. चारही जिल्ह्यात त्यांनी थेट बांधावर जाऊन घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार बालाजी कल्याणकर, डॉ. राहुल पाटील, संतोष बांगर आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जा, शिवसैनिकांना आदेश
ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे. शेतशिवाराचा चिखल झाला आहे. मात्र पंचनामे अत्यंत संथगतीने चालू आहेत. गेल्या वर्षीचा पीकविमा अजून मिळालेला नाही. केंद्राने जाहीर केलेले अनुदानही जमा झालेले नाही. कर्जमाफीचा डांगोरा पिटला, पण एक खडकूही मिळालेला नाही. जगण्याचे सगळे मार्गच बंद झालेत. ‘साहेब, यातून मार्ग काढा, आम्हाला वाचवा’ असे आर्जव शेतकऱ्यांनी करताच उद्धव ठाकरे यांनी गावागावांत शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करा. पंचनामे करून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करा, गावागावांत शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

Photo- उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात जानापुरी, सोनखेड, आंबेसांगवी, किरोडा, गुलाबवाडी, घोडज, माळाकोळी या गावांत थेट शिवारात जाऊन परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानाची पाहणी केली. विठ्ठल माने, किशन वाघ, उद्धव जाधव, सुभाष जाधव, व्यंकट लाडेकर, भीमराव कांबळे, रमेश कांबळे, तुकाराम कांबळे, तुकाराम लाडेकर आदी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. परिस्थितीमुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यांना माहिती देताना अक्षरश: रडूच कोसळले. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना ‘घाबरू नका, धीर सोडू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे’ असे वचनच यावेळी शेतकऱ्यांना दिले. यावेळी लोकसभा संघटक डॉ. मनोज भंडारी, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, तालुका प्रमुख जयवंत कदम, शहरप्रमुख तुलजेश यादव, अवतारसिंह पहरेदार, उपजिल्हाप्रमुख संजय ढेपे, भालचंद्र नाईक, तालुकाप्रमुख माधव मुसळे, मारोती पंढरे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हा संघटक दयाल गिरी, शहरप्रमुख सचिन किसवे, रामभाऊ चन्नावार, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आदींची उपस्थिती होती.

अन् उद्धव ठाकरे गहिवरले….
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकटाचे आभाळ फाटले. जेमतेम पडलेल्या पावसावर सोयाबीनचे पीक फोफावले. परंतु कापणीला आलेले पीक परतीच्या पावसाने पार धुऊन नेले. किरोडा गावातील एका शेतकऱ्याने आपले दु:ख मांडताना हंबरडाच फोडला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने त्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. त्याचा टाहो ऐकून क्षणभर उद्धव ठाकरे नि:शब्द झाले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून कातर स्वरात ते म्हणाले, ‘खचू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.’

साहेब, कर्जमाफीने फसवले
कर्जमाफी केली म्हणून मोठा गाजावाजा करण्यात आला. पण शेतकऱ्यांना रुपयाही माफ झाला नाही. साहेब, कर्जमाफी झालेला शेतकरी म्हणून पालकमंत्र्यांनी माझा सत्कार केला. पण खडकूही पदरी पडला नाही, अशी व्यथा सदाशिव राम कुलगरले या शेतकऱ्याने मांडताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सारेच जण अवाक झाले. ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे हे अहमदपूर तालुक्यात आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील सुनेगाव सांगवी, उजना तसेच खंडाळी येथे परतीच्या पावसाने शेतशिवाराच्या केलेल्या नासाडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांची नड ओळखून त्याला तातडीने 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, महिला आघाडीच्या सुनीता चाळक, बालाजी रेड्डी, पप्पू कुलकर्णी, सतीश देशमुख, दिलीप सोनकांबळे, अंगद पवार, विलास पवार, नंदकुमार पवार, गुणवंत पाटील, किसन समुद्रे, गोपाळ माने, सुभाष काटे आदींची उपस्थिती होती.

घाबरू नका, शिवसेना तुमच्या सोबत
ओल्या दुष्काळाच्या दहशतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिप हातचा गेला, रब्बीची शाश्वती नाही. त्यामुळे भविष्याच्या चिंतेने काळवंडून गेलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मी आलो आहे. धीर सोडू नका, खचू नका. शिवसेना या संकटात तुमच्या सोबत उभी आहे अशा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव व इसाद येथे उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संकट प्रचंड मोठे आहे. त्यामुळे पंचनामे वगैरे होत राहतील. पण प्रशासकीय कारभाराच्या जंजाळात शेतकऱ्यांना अडकवू नका. रब्बीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

ओल्या दुष्काळाच्या संकटाला घाबरू नका. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारत आहे. अडचण आल्यास अध्र्या रात्री या केंद्राचा दरवाजा ठोठावा, शिवसैनिक तुमच्या मदतीसाठी सज्ज असेल. फक्त आत्महत्येचा विचार मनातही आणू नका. शेतशिवारात जा, बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोला, त्यांच्या अडचणी समजून घ्या, त्यांना मदत करा, असे आदेशच मी शिवसैनिकांना दिले आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. पीकविमा, कर्जमाफी मिळाली का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच शेतकऱ्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यावर तुमच्या आशीर्वादाने सरकार आलेच तर कर्जमाफी नाही तर थेट कर्जमुक्ती, सातबाराच कोरा करणार आहे. त्यामुळे हवालदिल होऊ नका, असे कळकळीचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम, आमदार डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, तहसीलदार स्वरुप कंकाळ, महिला जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, बाळासाहेब जाधव, अरविंद देशमुख, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, विष्णू मुरकुटे, अनिल सातपुते, हनुमंत पौळ, जितेश गोरे, जानकीराम पवार, संदीप राठोड, दयानंद कुदमुळे, मारोती आढे, दगडुअप्पा धुळे, मारोती आढे, बाळासाहेब भीमनपल्लेवार, नागेश यादव, राम नरवाडे, डॉ. मोहन कुलकर्णी, नामदेव जाधव आदींची उपस्थिती होती.

बँकांच्या नोटिसांकडे लक्ष देऊ नका
परळी येथून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काफिला माजलगावात आला. उद्धव ठाकरे माजलगावात पोहचेपर्यंत अंधार दाटला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच, असे ठणकावून सांगितले. संकटाच्या या काळात शिवसेना तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि आत्महत्या करण्याचा विचार तर मनातही आणू नका. ओल्या दुष्काळाचे संकट डोक्यावर असताना बँकांनी कर्जवसुलीसाठी सावकारी चालू केली आहे. संभाजीनगर येथे मी बँकांच्या नोटिसा जाळून टाका, त्याकडे लक्ष देऊ नका असे स्पष्टच सांगितले आहे. याउपरही बँका तगादा लावत असतील तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, शिवसेनेने तुमच्यासाठी मदत केंद्र उभारले आहेत. तेथे अध्र्या रात्री आवाज द्या. माझा शिवसैनिक तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नितीन धांडे, सागर बहिर, बाप्पासाहेब घुगे, अशोक होके, तालुकाप्रमुख अप्पासाहेब जगताप, विनायक मुळे आदी होते.

तुमचा आशीर्वाद गरजेचा
अहमदपुर तालुक्यातील खंडाळी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेली पिके शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवली. ऐन संकटाच्या काळात बँकांनी पठाणी वसुली चालू केल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली. हातात काहीच उरले नाही. खायचे काय आणि बँकात भरायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला. आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर पर्यायच नाही असे शेतकऱ्यांनी म्हणताच उद्धव ठाकरे यांनी हा विचार अगोदर मनातून काढून टाका असे सांगितले. सातबारा कोरा करण्याचा शब्द मी दिलेला आहे. तो पूर्ण करणारच. त्यावर शेतकऱ्यांनी त्यासाठी आपला, शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असा घोषा लावला. त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गंगाखेड येथून माजलगावकडे जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे गोपीनाथगडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, संजय महाद्वार, विधानसभा प्रमुख राजा पांडे, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा संघटक रमेश चौंडे, अतुल दुबे, नारायण सातपुते, भाऊराव भोयटे, भोजराज पालिवाल, मोहन परदेशी आदी होते.

आपली प्रतिक्रिया द्या