कायदा करा राममंदिर बनवा, मंदिर बनणार म्हणजे बनणारच- उद्धव ठाकरे

72

सामना ऑनलाईन । अयोध्या

देशातील जनतेने गेल्यावेळेपेक्षा अधिक मजबूत सरकार केंद्रात निवडून दिले आहे. म्हणजेच राममंदिर व्हावे ही जनतेची भावना आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करत संसदेत कायदा करा आणि राममंदिर बांधा, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येतून बोलताना केली. केंद्रात मजबूत सरकार असल्याने लवकरच राममंदिर हे बनणार म्हणजे बनणारच असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी आज रामजन्मभूमी अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांचे दर्शन घतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राममंदिराप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

‘लोकसभा निवडणुकीआधी मी येथे आलो तेव्हा अयोध्यावासीयांना दिलेला शब्द आज मी पूर्ण केला आहे. उद्यापासून संसदेचे अधिवेशन आहे. त्याआधी मी विजयी खासदारांना घेऊन अयोध्येत आलो आहे. आधी रामचंद्रांचे आशीर्वाद आणि मग संसद हे मी करून दाखवले आहे’, असे ते म्हणाले. ‘राममंदिर कधी होणार हे मी इथे एकटा बसून सांगू शकत नाही. रामजन्मभूमीचा प्रश्न न्यायालयात असला तरी देखील शहाबानो खटला, तिहेरी तलाक यासाठी काय करण्यात आले ते सगळ्यांना माहीत आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहेच पण कायदा संसदेत बनतो आणि म्हणून अध्यादेश आणून कायदा बनवून मंदिर बांधा, अशी जनभावना असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘आपल्या देशात लोकशाही आहे. लोकांनी देखील गेल्यावेळेपेक्षा अधिक मजबूत सरकार केंद्रात दिले आहे. लोकशाहीत लोकभावनेचा आदर केला जातो. तेव्हा लोकभावनेचा आदर करा’.

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेची मदत सुरूच

राममंदिर लवकरच निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतानाच राममंदिर बनणार म्हणजे बनणारच असे ते म्हणाले. दुष्काळाच्या प्रश्नावरून विरोधकांच्या टीकेला देखील त्यांनी जोरदार उत्तर दिले. दुष्काळग्रस्तांना शिवसेना पूर्ण मदत करते आहे. दुष्काळात जेवढ कामं शिवसेनेनं केलं आहे, तेवढी मदत तरी टीका करणाऱ्या विरोधकांनी केली आहे का माहीत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, रामजन्भूमी अयोध्येवर रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांचे अयोध्यावासीयांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. जागोजागी पोस्टर्स, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या