कितीही अफजल खान आले तरी विजय आपलाच; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

धाराशिव येथील शिवसैनिक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री येथे आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आपलाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. मातोश्रीवर आलेल्या धाराशिव येथील कार्यकर्त्यांनी उदो उदोचा गजर केला. त्यानंतर या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.

”तुम्ही जो उदो उदोचा गजर केला त्याने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा आई भवानीचा आशिर्वाद आहे व तो मी अनुभवतोय., आईचा आशिर्वाद असेल तर कुणी किती अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरुवात झाली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. माझा आई भवानीवर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. त्यामुळे न्य़ाय आपल्याला मिळणारच”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी विजय कुणाचा – शिवसेनेचाच्या घोषणा दिल्या.

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी ते लवकरच आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येणार असल्याचे सांगितले. ”मला धाराशिवकरांचं अभिनंदन करायचं आहे. कैलासने काय पराक्रम केले ते आपल्याला माहित आहे. तो घट्ट पाय रोवून उभा आहे. हे तुमचे प्रतिनिधी आहेत आणि जिथे प्रतिनिधी घट्ट आहेत तिथे शिवसैनिक घट्ट राहणारच”, अशा शब्दात त्यांनी आमदार कैलास पाटील व शिवसैनिकांचे कौतुक केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर देखील टीका केली. ” ज्यांना तुम्ही सर्वांनी खस्ता खाऊन मोठे केले ते खोक्यात गेले. मी अजून घराबाहेर पडलेलो नाही. कारण ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. तेव्हापासून आजपर्यंत तुमच्यासारखे दररोज सैनिक इथे येत आहेत. जर असे सगळे सैनिक मोजले असते तर दसरा मेळाव्या पेक्षा जास्त सैनिक इथे असते. कुठे काहीही आपलं वाकडं झालेलं नाही. ही एक भवानी मातेची कृपाच आहे आपल्यावरती. ही नुसती कृपा नाही तिने दाखवून दिलंय की खरे कोण आणि खोटे कोण… अशी अनेक संकट आपल्यावरती आलेली आहेत. पण जसं छत्रपती महाराजांना भवानी मातेने तलवार दिलेली… की लढ. तसे तुम्ही सर्व जण भवानी मातेने मला दिलेली तलवार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.