जळगावात शिवसेनेने घातला महापौरांच्या खुर्चीला हार

28

सामना प्रतिनिधी । जळगाव

घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर मंजुर केलेला २ टक्के सेवा शुल्काच्या ठरावा शिवसेनेने जोरदार हरकत घेतली आहे. सदरची करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्यावतीने देण्यात येणारे निवदेन स्विकारण्यासाठी देखील महापौर न आल्याने शिवसेनेने महापौरांच्या खुर्चीलाच हार घातला. तसेच महापौर दालनात जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.

शिवसेनेने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, साफसफाईच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर जी अतिरिक्त करवाढ केली आहे. त्यास शिवसेनेने हरकत घेतली आहे म्हणून आपण सदरची करवाढ मागे घ्यावी. सद्यस्थितीत शहरातील साफसफाईची स्थिती अत्यंत दयनीय आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. असे असतांना पुन्हा अतिरिक्त कराचा बोझा नागरिकांवर टाकणे हे सर्वार्थी चुकीचे आहे. महापालिका सध्या विशेष साफसफाई कर ४ टक्के आणि हॉटेल व वाणिज्य प्रतिष्ठानसाठी २ टक्के अतिरिक्त कर आकारत आहे. त्यातच घनकचरा व्यवस्थापनासाठी सेवाशुल्क या शिर्षाखाली पुन्हा कराचा बोझा लादणे अन्यायकारक आहे. सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात प्रशासनाने १ टक्का कर वाढ प्रस्तावीत केली होती. त्यावेळी आमची सत्ता असतांना आम्ही नागरिकांवर बोझा नको म्हणून तो १ टक्का कराचा प्रस्ताव देखील नामंजुर केला होता. आपणही सामान्य जनतेचा विचार करावा व प्रस्तावीत करवाढ मागे घ्यावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेळणार असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महापौरांना फोन करुन देखील आल्या नाहीत
सदरचे निवदेन आपण स्विकारावे असे फोनवर महापौर सीमा भोळे यांना सांगण्यात आले. मात्र महापौरांनी मनपात येण्याची देखील तसदी घेतली नाही. यावरुन सत्ताधारी भाजपाला भरभरुन मतदान केलेल्या नागरिकांबद्दल किती काळजी आहे. असा प्रश्न उपस्थित राहत आहे. एवढा कर भरुन मुलभूत सुविधा तर देतच नाहीत परंतु करवाढ करण्यात मात्र भाजप पुढे आहे यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शिवसेनेच्या घोषणांनी महापालिका दणाणली
महापौर सीमा भोळे न आल्याने शिवसेनेने त्यांच्या खुर्चीलाच हार घातला. यानंतर शिवसैनिकांनी महापौर दालनातच ठिय्या आंदोलन सुरु केले. ’करवाढ मागे घेतलीच पाहिजे’, ’नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता.

निवेदन देते वेळी मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ.सुनिल महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, गटनेते अनंत जोशी, माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, अमर जैन, नगसेविका ज्योती तायडे, जयश्री महाजन, लता सोनवणे, शबाना खाटीक, जिजाबाई भापसे, नगरसेवक इब्राहीम पटेल, प्रशांत नाईक, नितीन बरडे, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, शिवसेना महानगर उपप्रमुख मानसिंग सोनवणे, शहर संघटक दिनेश जगताप, युवासेनेचे विस्तारक किशोर भोसले, महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी, मनिषा पाटील, ज्योती शिवदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या