
वाढत्या महागाईविरोधात सिंधुदुर्गात कुडाळ येथे मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
शिवसेना शाखा येथून डोक्यावरून गॅस सिलिंडर, लाकडे, तवा, भाकरीचे पीठ जिजामाता चौकापर्यंत रॅलीने आणत जिजामाता चौक येथे रस्त्यावर दगड लावून लाकडाच्या सहाय्याने चूल पेटवून भाकरी पकाव आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत एकच हल्लाबोल करण्यात आला. महागाई वाढविणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय ? खाली डोके वर पाय, गॅस दरवाढ कमी करा, नायतर खुर्ची खाली करा, पन्नास खोके, एकदम ओके, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, महिला आघाडी विधानसभा संघटक श्रेया परब, तालुका संघटक मथुरा राऊळ, स्नेहा दळवी, अतुल बंगे, संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, वारंगाची तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, नगरसेविका सई काळप, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, शहरप्रमुख राजू गवंडे, पावशी सरपंच वैशाली पावसकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, दीपक आंगणे, नरेंद्र राणे, बाळू पालव, युवासेना उपशहरप्रमुख गुरू गडकर, माजी जि.प. सदस्य राजू कविटकर, बाळा वेंगुर्लेकर, सत्यविजय बागवे, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, बंड्या कोरगावकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना राबवून सर्वसामान्यांना सबसिडी देण्याचे आमिष दाखवले, मात्र सबसिडी न देता जनतेची फसवणूक करीत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे हे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरत चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला आहे. केंद्र सरकार दिवसेंदिवस महागाई वाढवत असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असून आगामी सर्व निवडणुकीत या सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे जिल्हाप्रमुख संजय पडते यावेळी म्हणाले.