शिवसेनेच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी आटापिटा करणारे राष्ट्रवादी नेते तोंडावर आपटले

66

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

शिवसेना नगरसेवकांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे जुईनगरमध्ये टाकण्यात आलेल्या घरगुती गॅस पाइपलाइनचा लोकार्पण सोहळा काल मोठय़ा थाटामाटात पार पडला. या उद्घाटनानंतर नंदनवन सोसायटीमधील घराघरांत गॅसच्या शेगडय़ा पेटल्या. त्यामुळे गेल्या १० दिवसांपूर्वी श्रेय लाटण्यासाठी काम अर्धवट असताना या ठिकाणी घरगुती गॅस पाइपलाइनचे उद्घाटन करणारे राष्ट्रवादीचे नेते अक्षरशः तोंडावर आपटले आहेत.

शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी आणि विशाल ससाणे यांच्या अथक प्रयत्नातून जुईनगर येथे महानगर गॅसचे घरगुती गॅस पाइपलाइनचे काम प्रगतीपथावर आहे. सेक्टर २५ मधील नंदनवन सोसायटीमध्ये शनिवारी शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते घरगुती गॅस पाइपलाइनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, गटनेते द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, शहरप्रमुख विजय माने, शहर संघटक रोहिणी भोईर, नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, काशीनाथ पवार, विभागप्रमुख शिवाजीराव महाडिक, मिलिंद सूर्यराव, गणेश घाग, कृष्णा धुमाळ, शशिकला औटी आदी उपस्थित होते.

बनवाबनवी उघड झाली

शिवसेनेचे पाठपुराव्यामुळे पूर्ण झालेल्या या कामावर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १० दिवसांपूर्वी डल्ला मारला होता. महापौर जयवंत सुतार, सभागृहनेते रवींद्र इथापे आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी काम अर्धवट असतानाच गॅस पाइपलाइनचे उद्घाटन केले होते. उद्घाटन झाल्यानंतरही घरात गॅस न आल्याने गृहिणींमध्ये एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीची बनवाबनवी चव्हाटय़ावर आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे चेहरे काळवंडले.

आपली प्रतिक्रिया द्या