अयोध्येत राममंदिर निर्माणाचे काम तातडीने हाती घ्या! शिवसेनेची लोकसभेत आग्रही मागणी

38
vinayak-bhaurao-raut

विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले आहे. हे सरकार दिल्लीच्या तख्तावर बसण्यासाठी देशातील अनेक घटकांचे सहकार्य मिळाले. अनेकांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे हे सरकार आले तसेच हे सरकार पुन्हा सत्तेवर यावे यासाठी प्रभू रामचंद्राचा आशीर्वादही या सरकारच्या पाठीशी होता. त्यामुळे रामाचे स्मरण ठेवत केंद्र सरकारने तातडीने अयोध्येत पवित्र राममंदिर निर्माणाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने लोकसभेत केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी राममंदिर निर्माणाचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जावे ही देशातील कोटय़वधी हिंदूंची भावना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करून राममंदिर निर्माणाच्या चळवळीला वेग दिला दिला होता याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीनंतरही उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला गेले होते. राममंदिरासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. या सरकारकडून देशातील हिंदूंना मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती दाखवत सरकारने राममंदिर निर्माणाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी खासदार राऊत यांनी यावेळी केली.

शेतकऱयांना ठकविणाऱया पीक विमा कंपन्यांवर कारवाई करा

दुष्काळासह अनेक नैसर्गिक संकटांनी शेतकरी अगोदरच घायकुतीला आलेला असताना सरकारतर्फे दिला जाणारा पीक विमा या विमा कंपन्याच गायब करत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे शेतकऱयांची फसवणूक करणाऱया विमा कंपन्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही खा. विनायक राऊत यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या