
मीच महाविकास आघाडीचे सरकार पाडले, अशा बढाया मारणारे गद्दार मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यक्रमाकडे भूमकर फिरकलेच नाहीत पण शासकीय अधिकार्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे तानाजी सावंत यांनी प्रचंड थयथयाट केला. वड्याचे तेल वांग्यावर काढत त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनाच झाप झाप झापले. हे असले ‘उद्योग’ करायचे असतील तर मला बोलावलेच कशाला, असे म्हणत त्यांनी आपल्याच सरकारच्या उद्योग खात्यावरही तोंडसुख घेतले.
भूम येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता केंद्राच्या वतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. नाट्यगृहात येणार्यांसाठी तब्बल दीड हजार खुर्च्या लावण्यात आल्या. शासनाचा हा कार्यक्रम तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते संजय गाढवे यांनी पळवला. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनी बाजूलाच राहणे पसंत केले. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यासपीठावरही तुरळक लोक होते.
भरदुपारी कडक उन्हात घामाघूम झालेले तानाजी सावंत नाट्यगृहात आले आणि समोरच्या रिकाम्या खुर्च्या पाहून त्यांची सटकली. अशा कार्यक्रमाला मला कशाला बोलावता, कागदी घोडे नाचवता बाकी काही करत नाही, असे म्हणत त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनाच झापले. दुसरीकडे संजय गाढवेंच्या सूत्रसंचालन करणार्या कार्यकर्त्याचीही सावंत यांनी जोरदार हजामत केली.
View this post on Instagram
मागे एका बैठकीत बोलताना तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या काळात आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याच्या गप्पा मारल्या होत्या. धाराशिव हा निष्ठावान शिवसैनिकांचा जिल्हा आहे. तानाजी सावंतांमुळे या निष्ठेला डाग लागला, अशी प्रतिक्रियाही कार्यक्रमस्थळी ऐकायला मिळाली.