गद्दारांना मारले जोडे, रामदास कदम, शहाजी पाटील यांच्याविरोधात राज्यात उद्रेक

गद्दार रामदास कदम यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांविरोधात केलेल्या गलिच्छ आणि अश्लाघ्य वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. ठाणे, पनवेल, अलिबाग येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गद्दार कदम यांच्या पुतळय़ाला जोडय़ाने बडवले. तर रामदाम कदमचे डोके फिरले. यापुढे कदमने तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा जशास तसा जबाब देऊ, असा इशाराच शिवसैनिकांनी दिला. पंढरपुरात शिवसैनिकांनी आमदार शहाजी पाटील यांच्या प्रतिमेलाही जोडय़ांचा प्रसाद दिला.

ठाण्यात जांभळी नाका येथे शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या पुतळय़ाला जोडय़ाने बडवले. तर शिवसैनिकांनी हा पुतळा गगनभेदी घोषणा देत जाळून टाकला. यावेळी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, प्रवक्ते चिंतामणी कारखानी, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे महिला आघाडी संघटक समिधा मोहिते, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, राजश्री सुर्वे  यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, दीपक घरत, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, महिला आघाडी विधानसभा संघटक रेवती सकपाळ, रूपाली कवळे, उज्ज्वला गावडे, संगीता राऊत, मीना सदरे, संचिता राणे, सानिका मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी पनवेलमध्ये आंदोलन केले.

 अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामदास कदम यांच्या पुतळय़ाला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख संदीप पालकर, सतीश पाटील, चौलचे उपसरपंच अजित गुरव, शहर संघटक प्राची खरिवले व तालुक्यातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पंढरपुरात उग्र आंदोलन

रामदास कदम यांच्या विरोधात पंढरपुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी कदम आणि आमदार शहाजी पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला राग व्यक्त केला. जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे, पंढरपूर शहरप्रमुख रवी मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

रामदास कदम हाय हाय.. त्याचे खाली डोके वर पाय अशा घोषणांनी महाराष्ट्र दणाणून गेला. पनवेल येथे संतप्त शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या पुतळय़ाला चपलांनी फटकावत तो जाळला. राज्यभरातील आंदोलनांमध्ये महिला रणरागिणींची संख्या लक्षणीय होती.