मोदींना शिवसेनेपासून दूर ठेवण्याचं काम कोण करतंय, संजय राऊत यांचे मोठे विधान

7113

‘ज्या गोष्टी बंद दाराआड ठरल्या होत्या, ती खोली शिवसेनेसाठी मंदिर आहे. तेव्हा त्या मानल्या असत्या, पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्या असत्या तर आमचे पंतप्रधान मोदी जे सक्षम आहेत, त्यांचं मन मोठं आहे, कदाचित त्यांच्या माहितीत ही गोष्ट आली असती तर आज ही गोष्ट इथपर्यंत आली नसती, अशा खणखणीत शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मोठा खुलासा केला.

‘राजकारणात सत्याचा आवाज चालतोच असं नाही हे आम्हाला माहीत आहे. पण शिवसेनेने राजकारणाचा कधी व्यापार केलेला नाही. आम्ही व्यापारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही काम करतो. ज्यांची मी नावं घेतली त्या महान विभूतींचा इतिसाह काढून पहा त्यांनी कधी राजकारणाचा व्यापार केलेला नाही. देशासाठी काम केलं, देशासाठी बलिदान दिलं, देशासाठी त्याग केला आहे. तेव्हा राजकारण हे आमच्यासाठी काही बिझनेस, व्यापार, धंदा नाही’, असंही राऊत म्हणाले.

अमित शहा हे आम्हाला प्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचा अपमान आम्ही कधी केला नाही. उद्धव ठाकरे देखील त्यांचा उल्लेख नरेंद्र भाई असा करतात. खुद्द नरेंद्र भाई देखील प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख भाऊ म्हणून करतात. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा सलोखा ज्यांना बघवत नाही त्यातून हे होतं आहे की काय, अशी शंका देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली.

ही चर्चा दोघांमध्ये बंद खोलीत झाली. असं असलं तरी ज्या बंद खोलीत ही चर्चा झाली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली होती. जिथे बाळासाहेब वावरले, राष्ट्रभक्तीचा संदेश दिला, हिंदुत्वाला मार्गदर्शन केले. ते आमच्यासाठी मंदिर आहे. जर तिथे ठरलेल्या गोष्टी तुम्ही नाकारत असाल तो या मंदिराचा आणि बाळासाहेबांचा अपमान आहे. त्या पवित्र स्थळावरील गोष्टी नाकारायच्या असतील तर तुम्हाला शुभेच्छा, असंही ते म्हणाले.

जे बंद दाराआड ठरलं होतं ते समोर आणणार नाही असं अमित भाई म्हणत आहेत. पण लोकसभा निवडणुका होऊ दिल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आता ही गोष्ट समोर आणली आहे. ही नैतिकता नाही, राजकारणात किमान नैतिकतेची अपेक्षा आम्ही करतो, असं राऊत म्हणाले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा एखादी गोष्टं बोलतात तेव्हा ते पंतप्रधानांच्या नात्यानं बोलतात. पण ज्या गोष्टी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली आणि जे ठरलं त्याबद्दल अमित शहा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासकरून अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्या नसाव्यात, अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली. मोदींना शिवसेनेपासून दूर ठेवण्याचं कुणी काम करत आहे का?’, असा संशय देखील त्यांनी वेळी उपस्थित केला.

बंद खोलीत जी चर्चा झाली त्याची माहिती मोदींना द्यायलाच हवी होती. कारण आम्ही मोदींच्या नावावर मतं मागितली होती. मोदी हे या देशाचे सर्वोच्च नेता आहेत. आम्ही मोदींचा नेहमीच आदर केला आहे आणि करत राहू. ते पंतप्रधान बनण्याआधी ते मुख्यमंत्री होते, त्याआधी नेते होते तेव्हा पासून आम्ही त्यांचा आदर करत आलो आहोत. आज आम्ही सर्व मोदींवर तितकंच प्रेम करतो जितकी देशाची जनता करते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बंद खोलीतील गोष्ट बाहेर येऊ नये असे जर अमित भाईंना वाटतं तर ज्या गोष्टी ठरल्या त्यावर अंमल न झाल्यास या गोष्टी बाहेर येतात, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. ही काही सामान्य गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. ही गोष्ट ‘प्राण जाए पर वचन जाए’ हा आमचा जो मंत्र आहे त्याची ही गोष्ट आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या भविष्याची आहे. जेव्हा या गोष्टी तुम्ही मानत नाहीत तेव्हा या गोष्टी समोर येतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘राजकारण हा आमचा धंदा नाही. महाराष्ट्रानं नेहमी त्याग केला आहे, दिलेलं आहे, महाराष्ट्र हा ओरबाडणारा नाही’, असं देखील ते म्हणाले.

‘अमित शहा असं म्हणाले की नरेंद्र मोदींनी सभांमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं म्हटलं होतं, मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का नाही घेतला असा सवाल केल्याचं कळलं. पण आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो, त्यांना खोटं पाडायचं नव्हतं, पंतप्रधानांच्या मानअपामानाची पर्वा भाजपपेक्षा अधिक आम्ही केली. त्यामुळे त्यांचा आदर राखून आम्ही तेव्हा काही बोललो’, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. मात्र त्याच त्यांनी भाजपला देखील सवाल केला. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभांमधून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे सांगत होते, त्यावेळी अमित भाईंनी चर्चा करून हे का नाही थांबवलं. लोकसभा निवडणुका, प्रचार, विधासभा निवडणुका सारं होऊ दिलं आणि मग ही गोष्ट काढली’, असंही ते म्हणाले.

‘आम्हाला घाबरवून, धमकावून मिटवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आम्हाला मिटवण्याचा प्रयत्न करेल तो देखील नष्ट होईल’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या