आदिवासी बांधवांना घराचा मालकी हक्क देण्यासाठी शिवसेनेची धडक

कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील ८० ते ९० कुटूंबातील नागरिकांना राहत असलेली जागा मालकी हक्काने नावावर करुन देऊन शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी बांधवांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील आदिवासी नागरिक तीसहून अधिक वर्षापासून ग्रामपंचायतीच्या अभिलेखावर जागेचा मालकी हक्क यावा, यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासन दाद देत नसल्याने या ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची महिला व नागरिकांसह भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड येथे राहणारे सुधाकर आप्पाराव हुरणे यांनी टव्हा येथील सर्व्हे नं. ३८ मध्ये प्लॉट पाडून गावातील नागरिकांना गुंठेवारी पध्दतीने साध्या बाँड पेपरवर विक्री केली आहे. मात्र, हे प्लॉट सुधाकर हुरणे यांच्या मालकीचेच असून भोगवटदार म्हणून प्लॉट विकत घेतलेल्या नागरिकांची नावे लावण्यात आली आहेत. मालकी हक्क नसल्यामुळे ८० ते ९० कुटूंबातील नागरिकांना शबरी घरकुल, रमाई घरकूल, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही. ग्रामपंचायतीच्या नोंदीवर भोगवटदार म्हणुन नावे आहेत. या जागेवर ग्रामपंचायतीने रस्ते, पाणी व वीज ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, अकृषीक परवाना नसल्यामुळे मुळ जमिन मालक मालकी हक्क लावून देण्यास टाळाटाळ करत आहेत. आदिवासी कुटूंबांवर होत असलेला अन्याय दुर करावा व मालकी हक्क लावून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना छायाबाई शेळके, संतोष शेळके, शामराव बोरकर, राम कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या