‘गाजर हलवा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

राज्याची आर्थिक पत घसरल्याचं पाहणी अहवालातून समोर आल्यानंतर गुरुवारी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर एका वाक्यात या अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं तर हा ‘गाजर हलवा अर्थसंकल्प’ असल्याची खरमरीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू असून उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळात हजेरी लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असतात त्यांनी अत्यंत खणखणीत प्रतिक्रिया देत अर्थसंकल्प आणि त्याच्या घोषणांवर ताशेरे ओढले.

‘आजचा हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे, भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. अवकाळी पाऊस जसा झाला तसा मुंबईतही गडगडाट झाला. गडगडाट जसा झाला तसा मुंबईत पाऊस काही पडला नाही. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘गर्जेल तो बरसेल काय’, अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच अगदी एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर ‘गाजर हलवा अर्थसंकल्प’ असं मी याचं वर्णन करेन, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या योजना या अर्थसंकल्पात थोडसं नामांतर करून त्या पुढे मांडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आम्ही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत सुरू केली होती. त्याचं फिता कापायचं भाग्य यांना मिळालं होतं. आता तिच योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे, ही बरी बाब असल्याचंही ते म्हणाले.

ज्या गोष्टी जाहीर झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कधी येतील हाही एक प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

या आधी बोलताना ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारने दोन ते तीन वेळा अर्थसंकल्प मांडले होते. अजित पवार हे तेव्हा उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थमंत्रालय देखील सांभाळत होते. परिस्थिती कशी होती हे आपल्याला माहितच आहे. कोरोनाचं संकट होतं आणि केंद्र सरकार हे काही आमच्या बाजूचं नव्हतं. कधीही विचारलं तरी सरासरी 25 हजार कोटींहून अधिक जीएसटीची थकबाकी असायची. आमची अशी अपेक्षा होती की आता जवळपास सहा महिने झाले आहेत. राज्यात हे सरकार कारभार कसा करत आहे हे आपल्याला माहित आहेच’.

अजूनही अवकाळग्रस्तांच्या बांधावर अधिकारी पोहोचले नाहीत!

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

‘आज सकाळीच मी छत्रपती संभाजीनगरच्या अवकाळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो अद्याप सुद्धा त्यांच्या बांधावरती पंचनामा करायला एकही अधिकारी गेलेला नाही’, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार?

शेतकऱ्यांना ते सहा हजारापासून बारा हजारापर्यंत ते मदत करतात पण शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्षं वेधलं.

पंतप्रधानांच्या त्या घोषणेचं काय?

अर्थसंकल्प वाचताना विधान परिषदेत दीपक केसरकर यांनी माननीय पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख केला. यावर मला काही आक्षेप नाही. पण पंतप्रधानांनी सत्तेवर येताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल अशी घोषणा केली होती आता आठ वर्ष झाली पण त्याचा कुठेही पत्ता नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.