हिंदुस्थानला मुठीत ठेवणं म्हणजे हिंदुत्व नाही, चौकीदारी नाही, शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

विरोधी पक्ष आणि लोकशाहीलाच संपवून टाकण्याचे दळभद्री राजकारण देशात आणि राज्यात सुरू आहे. हिंदुस्थानला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा, याला आम्ही हिंदुत्व मानत नाही. ही देशाच्या गुलामगिरीची सुरुवात आहे, यात देशभक्ती नाही आणि चौकीदारीही नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

खासदार संजय राऊत शनिवारी मालेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा लोकशाहीवरचा आघात आहे. हा देश हुकुमशाहीकडे पोहोचला आहे. यावर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी व भाजप लोकशाहीला मारक भूमिका घेत आहेत, हे खरे हिंदुत्व नाही, असे टीकास्त्र्ा त्यांनी सोडले. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटावर देशात छी-थू होतेय. त्यांनी खरोखरच क्रांती केली असेल तर राजीनामे देऊन निवडणुकांना सामोरे जावे. खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाले कोण, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

मालेगाव येथे रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी जाहीर सभा होईल. या सभेची मोठय़ा प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात घडलेल्या गद्दारीच्या प्रकरणामुळे जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून, तो उद्रेक या सभेत दिसून येईल, असे ते म्हणाले.