मिंधे-भाजप राजवटीत महाराष्ट्रात जंगलराज, कायदा सुव्यवस्थेची ऐशीतैशी; शिवसेनेची टीका

पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा दोन ते तीन जणांनी पिस्तुलातून चार ते पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. गेल्या आठवड्यात पुण्यात कोयत्या गँगने एका पोलिसाच्या कपाळावर कोयत्याने वार केला होता. या सर्व घटनांमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या गुन्ह्यांमुळे तिथल्या गुंडांना पोलिसांचा व सरकारचा वचक राहिला नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या घटनांवरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिंधे भाजप सरकावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ”काल पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर ह्यांची आधी गोळीबार आणि त्यानंतर कोयत्याने वार करुन भरचौकात हत्या करण्यात आली. गृहमंत्र्यांनी गुंडांना पाठीशी घालत राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवलेत. राज्यात सर्वत्र गुंड खुलेआम गोळीबार, कोयते घेऊन फिरताहेत आणि गृहमंत्री वेगळ्याच जगात वावरत आहेत”, अशी टीका शिवसेनेने ट्विटरवरून केली आहे.

घरगुती वादातून बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण कोमकर आणि  सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.