बाळासाहेबांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच सामाजिक उपक्रमांची यशस्वी घोडदौड, सुभाष देसाई यांनी व्यक्त केली कृतज्ञता

प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी समाजातील दुर्लक्षित कप्पे ओळखा आणि काम करा, असा मूलमंत्र आम्हाला दिला होता. त्याच सल्ल्यामुळे संस्थेची सामाजिक पातळीवर यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी कृतज्ञता प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी शनिवारी व्यक्त केली. संस्थेच्या 51 व्या वर्धापन दिन सोहळय़ात ते बोलत होते.

गोरेगाव पश्चिमेकडील प्रबोधन क्रीडा भवनच्या प्रांगणात प्रबोधन गोरेगाव संस्थेचा 51 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधन गोरेगाव संस्थेला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या असाधारण कार्याबद्दल सोहळय़ात गौरवोद्गार काढण्यात आले. तसेच गोरेगाव शिवसेनेतर्फेदेखील कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, खजिनदार रमेश ईस्वलकर, सहकार्यवाह देविदास पवार, शरदचंद्र साळवी हे मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या स्थापनेवेळी जे लोक होते तेच लोक आजही संस्थेच्या सोबत आहेत ही चमत्कारिक गोष्ट आहे. संस्थेने यशस्वीपणे सुवर्णमहोत्सवी वाटचाल केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच संस्थेला विधायक उपक्रम राबवताना मोठे बळ मिळाले आहे, असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. आजचे शिक्षण पदव्या देते, रोजगार देत नाही. रोजगाराची हीच पोकळी भरून काढण्यासाठी संस्थेने कौशल्य शिक्षणावर भर दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी ‘मराठी बाणा’चे प्रमुख अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला सावंत यांनी केले. ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाने सोहळय़ाची रंगत वाढवली. कार्यक्रमाला प्रबोधन संस्थेचे हितचिंतक तसेच गोरेगावकरांनी बहुसंख्येने हजेरी लावली होती.