मराठी भाषेचे वैभव वाढवणारे दिमाखदार भवन उभारा : उद्धव ठाकरे

मराठी भाषेचे वैभव वाढवणारे दिमाखदार भवन उभारा, ज्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठी भाषा भवनासंदर्भात विधान भवनात आयोजित बैठकीत व्यक्त केले. मराठी भाषा भवनाची वास्तू अशी ऐटबाज असावी की मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा इतिहास आणि मराठीची थोरवी त्यातून येणाऱया पिढय़ांना समजावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी मराठी भाषा भवनासंदर्भात आज विधान भवनात विशेष बैठक बोलवली होती. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

सर्व मराठी भाषिक नागरिकांना मुंबईत आल्यानंतर मराठी भाषा भवनाला आवर्जून भेट द्यावी असे वाटेल अशा पद्धतीची त्याची रचना असली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाबद्दल आजच्या बैठकीत काही मूलभूत सूचना मांडल्या. मराठी भाषा भवन असो वा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असो, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती, असे या बैठकीनंतर डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या. सर्वपक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे,’ असेही त्या म्हणाल्या.

या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, मनीषा कायंदे, चेतन तुपे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, निलय नाईक, प्रसाद लाड, धीरज देशमुख, रामदास आंबटकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वास्तुविशारद पी. के. दास आदी उपस्थित होते.

फडणवीसांसोबत फक्त हाय हॅलो

उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले तेव्हा प्रवेशद्वारावरच त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. दोघांनीही स्मितहास्य करीत एकमेकांकडे पाहिले. दोघेही एकमेकांशी बोलत बोलत विधान भवनाच्या इमारतीत आले. तो धागा पकडत प्रसारमाध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, पूर्वी एक खुलेपणा होता. आता बंद दाराआड चर्चा फलदायी होते असे म्हणतात. आमची तशी झालीच तर नक्कीच बोलू. आज फक्त रामराम… हाय हॅलो करतो तसे झाले.

स्क्रिप्ट आली आणि ते बोलले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारच्या सभेतील भाषणाबाबतही माध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 18 वर्षांपासूनचे ते घासले, पुसलेले भाषण होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी माहीममधील अनधिकृत बांधकामाचा व्हिडीओ दाखवला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बांधकाम काही नवीन नाही. त्यावेळी मनसेचेच आमदार आणि नगरसेवक तिथे होते. पत्र दिले आणि कारवाई झाली. इतक्या तातडीने काही कारवाई होत नाही. तसे असेल तर राज्यातील इतरही अनधिकृत बांधकामे त्यांना दाखवा. ते पत्र देतील आणि कारवाई होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केलेल्या वैयक्तिक आरोपांबाबत माध्यमांनी विचारले असता 14 मे रोजी बीकेसीतील सभेमध्ये त्याबद्दल मी माझे म्हणणे मांडले होते. तेव्हा एका चित्रपटाचा दाखला मी दिला होता. तोच तुम्ही पुन्हा बघू शकता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मूळ आराखडय़ात कोणताही बदल करणार नाही!सरकारची ग्वाही

महाविकास आघाडी सरकारने बनवलेल्या मराठी भाषा भवनाच्या मूळ आराखडय़ात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत दिली. उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाच्या कामाबाबत बैठकीमध्ये काही सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचा सरकारकडून सकारात्मक विचार केला जाईल, असेही केसरकर यांनी नमूद केले. मराठी भाषा भवनाच्या कामाला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला त्याचे भूमिपूजन केले होते. वर्क ऑर्डरही दिली होती, परंतु अद्याप तिथे एक वीटही रचली गेलेली नाही. मराठी भाषा भवनामध्ये आणखीही कार्यालये असणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. बैठकीत आमची मते आम्ही मांडली आहेत. आता सरकार लवकरच निर्णय घेईल.