आगामी विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील गद्दारांना जोरदार धडा शिकवण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणींनी केला आहे. नेरुळ येथील सेक्टर 12 मधील देवाडिगा हॉलमध्ये शिवसेनेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी खोके सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे नेरुळचा परिसर दणाणून गेला.
शिवसेना महिला आघाडी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नेरुळ येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला ठाणे जिल्हा संपर्क संघटक शिल्पा सरपोतदार, नवी मुंबई संपर्क संघटक रंजना नेवाळकर, गायत्री आवळेगावकर, निरीक्षक रश्मी पहूडकर, वेदिका कांबळी यांनी संबोधित केले. सर्व महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून बेलापूर मतदारसंघाचा आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, अतुल कुळकर्णी, सुमित्रा कडू, शहरप्रमुख काशिनाथ पवार, उपजिल्हा संघटक वसुधा सावंत, उषा रेणके, निशा पवार, आरती शिंदे, आशालता गोंधळी, शहर संघटक कोमल वास्कर आदी उपस्थित होते.
नवी मुंबईवर भगवाच फडकणार
मिंधे गट आणि खोके सरकारच्या खुनशी कारभाराचा जनतेला आता कंटाळा आला आहे. त्यामुळे या सरकारला घालवण्यासाठी जनता फक्त विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईमध्ये खोके सरकारचे समर्थक सपाटून मार खाणार आहेत. कोणी कितीही वल्गना केल्या आणि कोणतेही आमिषे दाखवली तरी यांचे खरे रूप आता जनतेच्या निदर्शनास आले आहे. दिशाभूल करणारे किती जीआर निघाले तरी नवी मुंबईवर आता फक्त भगवाच फडकणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.