उद्धव ठाकरे यांनी पुरविला बळीराजाच्या लेकीचा हट्ट

2397

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 15) सातारा, सांगली जिल्ह्यांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या दौऱयात साताऱयातील काटेवाडी येथे उद्धव ठाकरे यांचे एक वेगळे आणि हळवे रूप पाहायला मिळाले. बळीराजाच्या मुलीने आपल्या घरी येण्याचा केलेला हट्ट उद्धव ठाकरे यांनी वडीलकीच्या मायेने पुरविल्यानंतर तिचा आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल काटेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱयांची गाऱहाणी ऐकून घेत होते. यावेळी शेतकऱयांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढत एक मुलगी उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याचा प्रयत्न करीत होती. ‘मला साहेबांना भेटायचंय… मला साहेबांना भेटायचंय…’ असे म्हणत ती उद्धव ठाकरे यांच्या गाडीजवळ गेली, मात्र सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्ला दिला, मात्र ‘मी चेंगरली तरी चालेल पण मला साहेबांना भेटायचंच आहे’ असा धोशा तिने लावला.

शेतकऱ्यांशी बोलत असतानाही उद्धव ठाकरे त्या मुलीची धडपड पाहत होते. त्यांनी तिला बोलावून घेतले आणि तिची चौकशी केली तेव्हा तिने ‘माझे नाव कांचन कोरडे’ असे सांगत ‘माझ्या घरी चला’ अशी विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी तिची समजूत काढत ‘नंतर येईन’ असे सांगितले, मात्र तिने ‘मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही काहीही करा पण माझ्या घरी चला’ असा हट्टच लावून धरला. कांचनची धडपड पाहून अखेर उद्धव ठाकरे यांनी तिचे मन राखले. तिला आपल्या गाडीत बसवून थेट कांचनचे घर गाठले.

आपली प्रतिक्रिया द्या