भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार! उद्धव ठाकरे यांचा घणाघात; चिखलीत शिवसेनेची विराट सभा,भगवे तुफान!

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले… आता महाराष्ट्राचे तुकडे पाडून पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही तुम्ही कर्नाटकला देणार आहात का, असा संतप्त सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर हल्ला चढवला. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत इतर पक्षाचे नेते चोरणारा भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार आहे, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. बुलढाण्यातील चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. या सभेच्या निमित्ताने जणू भगवे तुफानच अवतरले. या गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आसुड ओढताना मिंधे सरकार आणि भाजपची अक्षरशः पिसे काढली.

शिवसेनेवर आघातांवर आघात केले जात आहेत. लक्षात ठेवा, शिवसेना म्हणजे काही मेलेले गाढव नाही. हा धगधगता अंगार आहे. कितीही प्रयत्न करा, शिवसेना पुन्हा नव्याने, ताठ बाण्याने, ताठ कण्याने उभी राहणार!

उद्धव ठाकरे यांनी विराट सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आज शहीददिन आहे, संविधानदिन आहे. शुभेच्छा द्यायच्या तरी कशा? देशाचे संविधान सुरक्षित आहे का, असा घणाघाती सवाल करतानाच उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचा पुनरुच्चार केला. लोकशाही हवी आहे की हुकूमशाही हे ठरविण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हात की सफाईजनतेने पाहिली

मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावर शपथ घेतली. एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येला गेलो होतो. मिंधे मुख्यमंत्री आणि 40 रेडे गुवाहाटीला गेलेत. हात दाखवायलाही गेले होते, ज्योतिषाकडे! ज्यांना स्वतःचे भविष्यच माहीत नाही, ते सरकारचे भविष्य पाहण्यासाठी गेले होते. जनतेने यांची हात की सफाई पाहिलीय! तुमचे मायबाप तिकडे दिल्लीत आहेत, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. बरं झालं गेले. फसवे चेहरे होते. नितीन देशमुखांनाही सोबत नेले, पण कापले तरी सोबत येणार नाही, असे सांगून बहादुरीने देशमुख परतले. ही अस्सल बावनकशी निष्ठा! नाही तर काय झाडी, काय डोंगार… सगळे ओक्के… असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभास्थळी टाळय़ांचा कडकडाट झाला. जे 40 रेडे म्हणा, गद्दार म्हणा गेलेत ना त्यांनी हिंमत असेल तर आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही, असे जगजाहीर करावे. यांना बाळासाहेब पाहिजेत, शिवसेना पाहिजे आणि वर मोदींचा आशीर्वादही पाहिजे. काय करायचे या गद्दारांचे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने ‘खाली डोकं वर पाय’ असे उत्तर दिले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी यांना डोके असते तर कशाला गद्दारी केली असती, असा टोला लगावला. हे गद्दारीचे विष काढून फेकले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भैया मेरे राखी के बंधन को निभाना

बुलढाण्याच्या शेजारीच असलेल्या ताईंना खासदार केले. लोकांनी राब राब राबून प्रचार केला. या ताईंना धमक्या आल्या. मुंबईतून लोक आले. त्यांच्यावरच्या आरोपांचा पाढाच वाचला. ताईंच्या चेल्या-चपाटय़ांना अटका झाल्या, पण ताई मोठय़ा हुशार. त्यांनी थेट पंतप्रधानांनाच राखी बांधली. ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना…!’ मग ईडी, सीबीआय अन् कसचे काय! हिंमतच झाली नाही. ही चालूगिरी लोक काय बघत नाहीत? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आदर्श संपविण्याचा डाव

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा घाट घातला जात आहे आणि महाराष्ट्राचे मिंधे मुख्यमंत्री 40 गावे देऊन टाकू, त्याबदल्यात पाकव्याप्त कश्मीरातील 100 गावे पंतप्रधान आपल्याला देणार आहेत, अशी फुशारकी मारतील. महाराष्ट्र भुकेपंगाल करण्याचा, तरुणाई देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे. छत्रपतींवर अश्लाघ्य टीका करून आमचे आदर्श संपवायचे. महाराष्ट्रच रसातळाला न्यायचा असेच दिसते आहे. अमित शहा यांनी आम्ही गुजरातेत दंगलखोरांना धडा शिकविला, अशी बढाई मारली. बाबरी पाडली तेव्हा कुठे बिळात लपून बसला होतात? तेव्हा मुंबई पेटली. शिवसैनिकांनी छातीचा कोट करून मुंबई वाचवली. शिवसेनेने डरकाळी पह्डताच अमरनाथ यात्रा सुरू झाली. हे घडले ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज या नावामुळे! छत्रपती नसते तर तुमचेही नाव काहीतरी भलतेच असते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंमत असेल तर पडा सरकारमधून बाहेर

महाराष्ट्राचा रोज अपमान केला जातोय. छत्रपतींबद्दल वाटेल ते बोलले जाते. अब्दुल गटार! राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी देतो! मी मुख्यमंत्री असतो तर लाथ मारून हाकलला असता. महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मी असेच हाकलले होते. महिलांविषयी असे बोलले जाते आणि मिंधे शेपूट घालून बसतात. अरे वाघ आहात का गांडूळ! सांगा हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि हिंमत असेल तर पडा सरकारबाहेर. ज्योतिषाकडे जाता. शेतकऱ्यांकडे का येत नाही, हे सांगत असतानाच उद्धव ठाकरे यांनी चिखली तालुक्यातील कोलारा गावातील गजानन साळुंके या शेतकऱ्याचे उदाहरण दिले. पाच एकर सोयाबीनचा विमा त्याने काढला होता. त्याला अवघे 33 रुपये मिळाले. मागे शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने ‘देता की जाता’, असे आंदोलन केले होते. तेव्हा केंद्रात कृषिमंत्री असलेल्या शरद पवार यांनी कर्जमाफी केली होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. किती जणांचे कर्ज माफ झाले होते, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच अख्ख्या सभेने हात वर करून आमचे कर्ज माफ झाले होते, असे उत्तर दिले.

खोके सरकार आले अन् पनौती लागली

राज्यात सगळे ठीक चालले होते, पण सत्तेच्या अघोरी लालसेपायी आपले सरकार पाडले. हे खोके सरकार आले आणि राज्याच्या नशिबी पनौतीच लागली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हे सरकार आल्यानंतर राज्यात हजारांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्याची अन्नान्न दशा झाली आहे अन् तुम्ही कसले नवस फेडता, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दिवाळीच्या वेळी मी आलो होतो, अतिवृष्टीची पाहणी करायला. त्यावेळी शेतकऱ्यांनी ‘दिवाळी आहे, आम्ही खायचे काय’, असे विचारले. अन्नदाताच त्याच्या भूकेची लक्तरे मांडतो. पंतप्रधानांचे शिव्या खाऊन पोट भरत असेल, शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार हे सांगा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

आत्महत्या करायची नाही असा शब्द द्या

शिवसेनेवर आघातांवर आघात केले जात आहेत. लक्षात ठेवा शिवसेना म्हणजे काही मेलेले गाढव नाही. हा जिवंत रसरसता अंगार आहे. कितीही प्रयत्न करा. शिवसेना पुन्हा नव्याने, ताठ बाण्याने, ताठ कण्याने उभी राहणार! तुमच्या भरवशावर! पण एक शब्द मला द्या, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. प्रसंग कितीही कठीण असो, आत्महत्या करायची नाही. शिवरायांनी आपल्याला लढायला शिकवले आहे. हे सरकार म्हणे लंडनहून शिवरायांची तलवार आणणार आहे. तलवार आणाल, पण ती पेलण्यासाठी मनगट पाहिजे ना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

जुलूमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल

सध्या जुलमाचे राज्य चालू आहे. खोटे बोलतात. काहीही बोलतात. महाराष्ट्र तोडण्याचे कटकारस्थान केले जात आहे. या जुलूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरावेच लागेल. महाराष्ट्रातील मर्दानगी संपली, असे दिल्लीकरांना वाटते का? संजय राऊत भगवा फडकावत जेलात गेले. निष्ठsचे हे ज्वलंत उदाहरण! गेले ते रेडे, तोतये! बोगस माणसे. काय त्यांचे कर्तृत्व? पण आता यांच्या जुलूमशाहीला तडाखेबंद उत्तर द्यावेच लागेल. तुम्ही सोबत येणार का, असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच अख्ख्या सभेने हात वर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता भाजपवाले म्हणतील तुमच्यातलाच मुख्यमंत्री केला आहे. मान्य आहे का तुम्हाला मुख्यमंत्री? हे मुख्यमंत्री म्हणे दिवाळीला शेतात गेले होते. हेलिकॉप्टरने! राज्यातले शेतकरी शेतात कसे जातात, कधीतरी याचाही विचार करा, असा खणखणीत टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

घराबाहेर पडलेत अन् गुवाहाटीला गेलेत

मी मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट होते. कुणीच घराबाहेर पडत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याची काव काव केली गेली, पण मी घरात बसून जे काही काम केले, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात आला ना! हे सगळे श्रेय तुमचे आहे, अशी कृतज्ञताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आताचे मुख्यमंत्री घराबाहेर पडलेत, गुवाहाटीला जाण्यासाठी असे सांगून उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला किती खोके मिळाले, असा सवाल केला. यांना जेवढे मिळाले, त्यापैकी काही शेतकऱ्यांना मिळाले असते तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. या मिंधे सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा उरली नाही, असे ते म्हणाले.

कश्मीरमध्ये पाट लावला तो काय होता?

शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत गेली, अशी आवई उठवली गेली. मिंध्यांनी म्हणे हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली. मग भाजपने कश्मीरमध्ये मुफ्ती मोहंमद सईद आणि महेबुबा मुफ्ती यांच्याशी पाट लावला, तो काय होता? काँग्रेसवाले भारतमाता की जय, वंदे मातरम् म्हणतात. महेबुबा मुफ्ती म्हणणार आहेत का? होय, आम्ही गेलो काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव मी मांडला, तेव्हा क्षणार्धात काँग्रेस, राष्ट्रवादीने त्याला होकार दिला होता. मग आम्ही नेमके काय सोडले, याचे उत्तर या लोकांनी दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नांगराची ताकद दाखवा

मिंधे गटाच्या गद्दारीवर वार करताना उद्धव ठाकरे यांनी काय कमी केले होते, असा प्रश्न केला. या बोक्यांना खोक्यांची भूक लागली होती म्हणूनच गद्दारी केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काय कमी केले होते यांना. पण रक्ताचा अपमान केला, निष्ठsचा अपमान केला. तात्पुरत्या मंत्रिपदाची झूल घालून मिरवत आहेत, पण गद्दारीचा जो कलंक कपाळी लागला आहे तो कसा पुसणार? तो कधीच पुसला जाणार नाही. हार-जीत सोडा, हा राजकारणाचा भाग आहे. पण नाती विसरून स्वार्थासाठी जे गेलेत, ते माफीच्या लायकीचे नाहीत. या गद्दारांना नांगराची ताकद दाखवा. पंजाबच्या शेतकऱ्यांनी बलाढय़ मोदी सरकारला झुकवले, ही ताकद आहे शेतकऱ्यांची. नांगर केवळ जमीन नांगरत नाही. याच नांगराने मागे हुकूमशाही उलथून टाकली होती. नांगरधारी शेतकरी! शिवसेना हे नाव गोठवले, धनुष्यबाण चिन्हही गोठवले, पण शिवसैनिकाचे रक्त पेटवले, मशाल पेटवली! निष्ठा हीच आमची ओळख आहे. त्यामुळे आता शांत राहायचे नाही, यांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरायचे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तुमच्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल. पण आत्महत्येचा विचारही शिवता कामा नये, असे कळकळीचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. तुमच्या रूपाने राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन झाले. आता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार का? महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरणार का? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच संपूर्ण सभेने वज्रमूठ आवळून हुंकार भरला.

पक्ष आहे की चोरबाजार

आम्हीही होतो भाजपसोबत अनेक वर्षे. राहिलाय का हा आता भाजप? काही आचार, विचार राहिलाय का? आयात पक्ष झालाय. भाकड पक्ष झाला आहे. मूळचे किती आणि आयात केलेले किती, हे एकदा सांगूनच टाका. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतलाय. नुसती दादागिरी. हुकूमशाही. बाकी दुसरे काही नाही. पक्ष आहे की चोरबाजार, असा जबरदस्त टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

आता आमचा विठोबाही नेणार का?

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातोय. मराठी माणसाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत यांची मजल गेलीय. राज्यपाल या पदाचा आम्हाला नक्कीच आदर आहे. पण त्या काळय़ा टोपीच्या खाली असलेल्या डोक्यामध्ये जो सडका विचार आहे, त्याबद्दल आम्हाला यत्पिंचितही आदर नाही. आता तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईही बोंबललेत. सोलापूर, अक्कलकोटवर त्यांनी दावा सांगितला आहे. गुजरातला निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातेत पळवले. आता पुढच्या वर्षी कर्नाटकच्या निवडणुका आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे करायलाही हे मागेपुढे पाहणार नाहीत. आमचा पंढरपूरचा  विठोबाही नेणार का? शतकाची वारकऱ्यांची परंपरा आहे वारीची. कर्नाटकाचा टोल भरून वारकऱ्यांना विठोबाचे दर्शन घ्यावे लागणार का? आमचे स्वामी समर्थही पळविणार  काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

फडणवीसांचा ऑडिओच ऐकवला…

पीक विमा पंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. त्यांची मस्ती उतरवली जाईल, असा खणखणीत इशारा देतानाच उद्धव ठाकरे यांनी वीज बिलाची वसुली चालू आहे का, असा प्रश्न केला. सभेतून होय होय, असा पुकारा होताच थांबा मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ऑडिओ क्लिप जाहीर सभेला ऐकवली. ‘मध्य प्रदेश सरकारने 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करून तेथील शेतकऱ्यांना वीज बिलमाफी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही मध्य प्रदेशचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना वीज बिल माफ करावे..!’ असा आवाज ऐकताच उद्धव ठाकरे यांनी ओळखा पाहू हा आवाज कुणाचा, असा सवाल केला. त्यावर अख्ख्या मैदानातून फडणवीस, फडणवीस असा आवाज झाला. थोडी तरी लाज बाळगा. या ठिकाणी त्या ठिकाणी अशी वेगळी भाषा कशासाठी? मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. तुम्ही वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

शेतकऱ्यांना छळणाऱ्यांना जाब विचारा…  रस्त्यावर उतरा!

पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान, शेतमालाला भाव अशा चक्रव्युहात शेतकरी अडकला आहे. त्याला दिलासा देण्याऐवजी मिंधे मुख्यमंत्री गुवाहाटीला गेलेत. मदतीच्या नावाखाली अजून शेतकऱ्यांच्या हाती छदाम पडलेला नाही. शेतकऱ्यांना भीक नको, हक्क हवा आहे. त्यामुळे आता बस्स झाले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपासूनच रस्त्यावर उतरा, असा स्पष्ट आदेशच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. आम्ही शेतकरी कर्जमुक्त केला, हिंमत असेल तर तुम्ही शेतकरी वीज बिलमुक्त करून दाखवा, असे आव्हान त्यांनी मिंधे सरकारला दिले.

फटकारे

मराठी माणसाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो, महिलांचा अवमान केला जातो. अरे तुम्ही वाघ आहात का गांडूळ? शेपूट घालून अवमान सहन करता आणि तेही केवळ सत्तेसाठी! हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा.

जे 40 रेडे म्हणा, गद्दार म्हणा गेलेत ना, त्यांनी हिंमत असेल तर आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही, असे जगजाहीर करावे.

सावरकरांचा अपमान करण्यात आला तेव्हा आम्ही ठणकावून बोललो. परखड भूमिका घेतली. आता छत्रपती शिवरायांचा अपमान झाला तेव्हा का नाही तुमचे तोंड उघडले? राज्यपालांची बॅग भरून त्यांना परत पाठविण्याची हिंमत का नाही दाखवलीत.

महाराष्ट्रात सगळे काही ठीक चालले होते, पण सत्तेच्या अघोरी लालसेपायी आपले सरकार पाडण्यात आले. त्यानंतर हे खोके सरकार आले आणि राज्याच्या नशिबी पनौती लागली.

सध्या जुलमाचे राज्य चालू आहे. खोटे बोलतात. काहीही बोलतात. महाराष्ट्र तोडण्याचे कटकारस्थान सुरू आहे. या जुलूमशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरावेच लागेल.

पंजाबच्या शेतकऱ्यांनी बलाढय़ मोदी सरकारला झुकवले. ही ताकद आहे शेतकऱ्यांची. नांगर केवळ जमीन नांगरत नाही. याच नांगराने मागे हुकूमशाही उलथून टाकली होती हे लक्षात ठेवा.